सध्या पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग ही टी20 स्पर्धा खेळली जातेय. स्पर्धेची साखळी फेरी आता अखेरीकडे येत असून उपांत्य फेरीत कोण जागा बनवणार यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्याचवेळी या स्पर्धेत उशिरा सहभागी झालेला ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू टीम डेव्हिड याने पहिल्याच सामन्यात धमाकेदार कामगिरी करून दाखवली.
डेव्हिड हा नुकताच मुलतान सुलतान्स संघाचा भाग बनला होता. आपल्या पहिल्याच सामन्यात खेळताना त्याने इस्लामाबाद युनायटेडच्या सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना अवघ्या 27 चेंडूंवर 60 धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये चार चौकार व पाच षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्याने आपले अर्धशतक केवळ 20 चेंडूंमध्ये पूर्ण केले. हे या पीएसएल हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. या खेळीदरम्यान त्याने सोळाव्या षटकात रूम्मन रईस याच्या एका षटकात 30 धावा फटकावल्या. यात 4 षटकार व एका चौकाराचा समावेश होता.
त्याच्या याच खेळीमुळे मुलतान संघ निर्धारित 20 षटकात 5 बाद 205 अशी मजल मारू शकला. मात्र, तरीदेखील मुलतान संघाला या सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले. इस्लामाबाद संघाच्या सर्व फलंदाजांनी योगदान दिल्यामुळे त्यांनी ही धावसंख्या यशस्वीरित्या पार केली.
डेव्हिड हा यापूर्वी सिंगापूर संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. मात्र, ऑस्ट्रेलियन पासपोर्ट असल्याने त्याने मागील वर्षी ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आयपीएलमध्ये तो मागील दोन हंगामापासून सहभागी होतोय. 2021 मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर मागील वर्षी मुंबई इंडियन्सने त्याच्यावर मोठी बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. यावेळी मुंबईला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
(Mumbai Indians Tim David Blistering Inning In PSL 2023 First Match For Multan Sultans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
होळीच्या रंगात रंगणे एलिस पेरीला पडले महागात; केसांचा रंग बदलताच म्हणाली, ‘मी केस दोन वेळा…’
‘बाबा, तुम्ही चांगलं केलंय…’, सर विवियन रिचर्ड्स यांच्या वाढदिवशी लेक मसाबाची पोस्ट तुफान व्हायरल