मंगळवारी(९ फेब्रुवारी) इंग्लंड संघाने एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताला ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात २२७ धावांनी मात दिली. याबरोबरच १-० अशी मालिकेत आघाडीही घेतली. या विजयात इंग्लंडचा कर्णधार जो रुटबरोबरच जेम्स अँडरससने मोलाचा वाटा उचलला. या सामन्यानंतर अँडरसनने त्याच्या कामगिरीबद्दल आणि संघाच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
त्याने या सामन्यात दुसऱ्या डावात ४२० धावांचा पाठलाग करत असलेल्या भारतातीय संघाच्या ३ विकेट्स घेतल्या. या तीन विकेट्सपैकी शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणे या दोन फलंदाजांच्या विकेट्स त्याने एकाच षटकात घेतल्या. विशेष म्हणजे त्याने सुरेख चेंडू टाकत या दोघांनाही त्रिफळाचीत केले होते. त्याचे हे त्रिफळाचीत पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले. त्याने या दोन विकेट्स एकाच षटकात घेतल्याने सामना जवळपास पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने वळला. एवढेच नाही तर पुढे अँडरसनने धोकादायक रिषभ पंतला देखील बाद केले.
त्याच्या कामगिरीबद्दल ३८ वर्षीय अँडरसन सामन्यानंतर म्हणाला, ‘प्रमाणिकपणे सांगायचं तर मी पायचीत किंवा मिड-विकेटला झेलबादची अपेक्षा केली होती. पण त्रिफळाचीत करणे नेहमीच आनंददायक असते. माझ्या आताच्या वयामध्ये असे बऱ्याचदा होत नाही, त्यामुळे मी त्रिफळाचीत केल्याने आनंदी आहे.’
त्याने पुढे म्हटले, ‘चेंडू चांगला रिव्हर्स स्विंग होत होता. आम्हाला माहित होते की योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. मी इथे उसळी मिळत असल्याने सुदैवी होतो. आमच्यासाठी रिव्हर्स स्विंगही मिळत असल्याने चांगली गोष्ट होती. नक्कीच खेळपट्टी संथ होती आणि तुटत होती. त्यामुळे हवेत मिळणाऱ्या मुवमेंटमुळे आम्हा वेगवान गोलंदाजांना वाटत होते की आम्ही कोणत्याही चेंडूवर विकेट घेऊ शकतो.’
याबरोबरच विजयाबद्दल अँडरसन म्हणाला, ‘पाच दिवसापर्यंत खुप मेहनत करावी लागली. मला चांगले वाटत आहे. श्रीलंकेचा दौरा चांगला होता आणि तीच लय मी इथेही कायम ठेवण्यात यश मिळवले.’ It doesn’t happen very often at my age so I’m really happy with it – James Anderson on his performance
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
अँडरसनने या सामन्यात पहिल्या डावातही २ विकेट्स घेतल्या होत्या. अँडरसन हा कसोटीमध्ये ६०० विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे. एवढेच नाही तर तो भारताविरुद्ध कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाराही गोलंदाज आहे. त्याने भारताविरुद्ध ११५ विकेट्स कसोटीत घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर झाले नाराज, तडकाफडकी दिला उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा
पुन्हा मैदानात उतरणार सचिन, सेहवाग आणि लारासारखे दिग्गज; ‘या’ स्पर्धेत खेळताना दिसणार
आयपीएल २०२१ : दोन कोटी आधारभूत किंमत असलेले ‘हे’ तीन खेळाडू राहू शकतात लिलावात ‘अनसोल्ड’