रविवारी (8 मार्च) मेलबर्न येथे आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील अंतिम सामना भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने यावेळी 85 धावांनी पराभूत करत विश्वचषकावर 5 व्यांदा आपले नाव कोरले.
या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर युवा फलंदाज शेफाली वर्माला (Shafali Verma) रडताना पाहून खूप वाईट वाटले, असे ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) म्हणाला.
ब्रेट लीने आयसीसीच्या स्तंभात लिहिले की, “मला शेफालीबद्दल खूप वाईट वाटत होते. तिला रडताना पाहताना चांगले वाटत नव्हते. परंतु शेफालीला तिच्या कामगिरीचा अभिमान वाटला पाहिजे.”
“पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत अशा प्रकारची कामगिरी शेफालीची प्रतिभा आणि मानसिकता दृढता दाखवते. ती यामधून एक चांगली खेळाडू बनेल. या अनुभवातून शिकून शेफाली दमदार पुनरागमन करेल,” असेही लीने लिहिले.
“भारतासाठी ही निराशाजनक रात्र होती. परंतु भारतीय संघ पुनरागमन करेल. या ठिकाणी सर्व काही संपत नाही. ही तर फक्त एक सुरुवात आहे,” असे भारतीय संघाबद्दल लीने आपल्या स्तंभात लिहिले.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या होत्या आणि भारताला 185 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 19.1 षटकातच 99 धावांवर संपुष्टात आला. यामध्ये युवा फलंदाज शेफालीने फक्त 2 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–…तरच धोनीचे होऊ शकते टीम इंडियात पुनरागमन
–उपविजेत्या भारतीय महिला संघाबद्दल सर व्हिव्हिअन रिचर्ड्स म्हणाले…
–विश्वचषकाच्या फायनलनंतर ऑस्ट्रेलिया, भारत संघाला मिळाले एवढे करोड रुपये






