भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा पुढील महिन्यात सुरु होत आहे. यासाठी भारतीय संघ येत्या ३ दिवसात श्रीलंकेला रवाना होणार आहे. त्यापूर्वी या दौऱ्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आलेला शिखर धवन आणि या दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका निभावणारा राहुल द्रविड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
शिखर धवनच्या मते या श्रीलंता दौऱ्यात युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे. तो म्हणाला, ‘हा खूप चांगला संघ आहे. आमच्या संघात सकारत्मकता, विश्वास असून प्रत्येकाला चांगले प्रदर्शन करण्याचा विश्वास आहे. खेळाडू खूप उत्साही आहेत.’
याबरोबरच भारतीय संघाचे पहिल्यांदाच नेतृत्व करण्याबद्दल शिखर म्हणाला, ‘भारतीय संघाचे नेतृत्व करणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. पण त्याचवेळी एक संघ म्हणून आम्ही राहुल भाईबरोबर काम करणार आहोत. मी यापूर्वी त्याच्या प्रशिक्षणाखाली भारत अ संघाकडून खेळलो आहे. त्यावेळी बांगलादेश दौरा आम्ही केला होता आणि मी भारत अ संघाचा कर्णधार होतो. मला वाटते आम्ही संघ आणि सपोर्ट स्टाफ चांगले एकत्रित झालो आहोत. आता आमचे लक्ष मालिकेकडे असून आम्हाला या मालिकेतून बऱ्याच सकारात्मक गोष्टी पाहायच्या आहेत.’
https://twitter.com/BCCI/status/1409155956198371330
तसेच शिखर म्हणाला, ‘हे नवीन आव्हान आहे. पण याबरोबरच ही आमच्या सर्वांसाठी आपले कौशल्य दाखवण्याची एक चांगली संधी आहे. प्रत्येकजण याची वाट पाहात आहे. आमच्या क्वारंटाईनचे १३-१४ दिवस झाले आहेत आणि आता प्रत्येक खेळाडू मैदानावर उतरण्यास आतुर आहे. ३ दिवसात आम्ही श्रीलंकेला जाऊ. आमच्याकडे तयारीसाठी अजून १०-१२ दिवस आहेत.’ श्रीलंका दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ गेले २ आठवडे मुंबईमध्ये क्वारंटाईन होता.
अनेक युवा खेळाडूंनी भरलेल्या संघाबद्दल शिखर म्हणाला, ‘खेळाडू तयार आहेत आणि सामने खेळण्यास आतुर आहेत. या खेळाडूंनी आयपीएल आणि अन्य स्पर्धेत स्वत:ला सिद्ध केले आहे. संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे.’
असा होणार आहे श्रीलंका दौरा
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ ३ टी२० सामन्यांची आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवणार आहे. हा दौरा १३ ते २५ जुलै दरम्यान होईल. आधी वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर टी२० मालिका होईल. वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे १३, १६ आणि १८ जुलै रोजी होतील; तर टी२० मालिकेतील सामने २१, २३ आणि २५ जुलै रोजी होतील. हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत.
युवा खेळाडूंचा संघात समावेश
सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, देवदत्त पडीक्कल, के गाॅथम, चेतन सकरिया, वरुण चक्रवर्ती अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी असणार आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवन सांभाळणार असून भूवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे.
तसेच या संघात हार्दिक, कृणाल हे पंड्या बंधू, दिपक चाहर, नवदीप सैनी, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे असेही काही खेळाडू आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्थरावर काही सामने खेळण्याचा अनुभव आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! वेस्ट इंडिजचे’हे’ ४ खेळाडू तब्बल ६ वर्षांनी एकत्र खेळले आंतरराष्ट्रीय टी२० सामना
३८ व्या वर्षीही मिताली राजचा दबदबा कायम, इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावत केला ‘हा’ विक्रम
‘तो’ एक झेल सोडणे भारतीय संघाला WTC फायनलमध्ये पडले महागात, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे मत