इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२२ स्पर्धेसाठी सर्व जुन्या ८ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. तसेच अहमदाबाद आणि लखनऊ या दोन्ही संघांना मुक्त केलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी ३ खेळाडू रिटेन करण्याची संधी असणार आहे. ज्याची अंतिम तारीख २५ डिसेंबर असणार आहे.
तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी मेगा लिलाव सोहळा डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरवातीला पार पडू शकतो. दरम्यान, ८ संघांनी मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये डेविड वॉर्नर, हार्दिक पंड्या, ईशान किशन, फाफ डू प्लेसिस सारखे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची बोली लागू शकते. तसेच असे ३ भारतीय खेळाडू देखील आहेत, ज्यांच्यावर बोली लागणे थोडे कठीण दिसून येत आहे.चला तर पाहूया कोण आहेत ते खेळाडू.
आयपीएल २०२२ साठी या ३ खेळाडूंवर बोली लागणे कठीण
१)हरभजन सिंग – भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याला कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुक्त केले आहे. आयपीएल २०२१ लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने हरभजन सिंगला २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते. परंतु, त्याची या हंगामातील कामगिरी आणि त्याचे वय पाहता त्याला पुढील हंगामासाठी कुठल्याही संघात स्थान मिळणे कठीण दिसून येत आहे.
जरी त्याने आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लिलावात सहभाग घेतला, तरी देखील त्याला कुठलीही फ्रँचायजी त्याच्यावर बोली लावेल, याची शक्यता खूप कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या हंगामात त्याला अवघे ३ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. तसेच त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकूण १६३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १५० गडी बाद करण्यात यश आले आहे.
२)सचिन बेबी – आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सचिन बेबीला २० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु, त्याला पुढील हंगामासाठी मुक्त करण्यात आले आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याला केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याला अवघ्या ७ धावा करता आल्या होत्या.
सचिन बेबीने २०१३ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यांनतर २०१६ आणि २०१९ मध्ये देखील तो खेळताना दिसून आला होता. त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला १९ सामन्यात अवघ्या ३३ धावा करण्यात यश आले आहे. ही कामगिरी पाहता त्याचे आयपीएल २०२२ स्पर्धा खेळणे कठीण दिसून येत आहे.
३) करूण नायर – भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणाऱ्या करूण नायरची आयपीएल कारकीर्द देखील जवळ जवळ संपली आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते. परंतु, दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत त्याला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
आयपीएल २०२० स्पर्धेत त्याला ४ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु, या ४ सामन्यात त्याला अवघ्या १६ धावा करता आल्या. त्यामुळे आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याच्यावर बोली लागणं कठीण दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आर्चर, स्टोक्स राजस्थान रॉयल्समधून मुक्त! संगकाराकडून निर्णायामागचे खरे कारण उघड
आरसीबीने रिलीज केलेल्या गोलंदाजाचा टी१० लीगमध्ये डंका, अवघ्या १० चेंडूंत मिळवले तब्बल ५ बळी
कसोटी क्रमवारी: श्रेयस अय्यरची पदार्पणातच मोठी उडी, शाहिन आफ्रीदीही टॉप ५ मध्ये