भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषक 2022 मधून बाहेर पडला आहे. जडेजाचे केवळ दोन सामने खेळून संघाबाहेर जाणे भारतीय संघाच्या अजिबात फायद्याचे नाही. जडेजा आपल्या अष्टपैलू खेळाने संघात एक समतोल आणतो. त्यामुळे त्याची संघातील जागा भरून काढणे काहीसे अवघड होते.
आशिया चषक 2022 च्या सुपर फोरमध्ये भारताला आता तीन सामने खेळायचे आहेत. अंतिम सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या तीन सामन्यापूर्वी जडेजाचे संघातून बाहेर जाणे भारतासाठी एक धक्का आहे. आता त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघातील महत्त्वाचा सदस्य असलेला जडेजा मागील टी20 विश्वचषकानंतर मात्र सातत्याने दुखापतींशी झुंजतोय. यामागील दहा महिन्याच्या काळात जडेजा किती वेळा दुखापतग्रस्त होत संघाबाहेर गेला याचा आढावा आपण घेऊया.
विश्वचषकानंतर दुखापतीमुळे नोव्हेंबर 2021 मध्ये जडेजा सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला. याच दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेत समाविष्ट केले गेले नाही. ही मालिका डिसेंबर 2022 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेलाही त्याला मुकावे लागले. जडेजा विश्वचषकानंतर भारतीय संघासाठी सहा महिने एकही सामना खेळला नाही.
विश्वचषकानंतर जडेजाने थेट आयपीएल 2022 मधून पुनरागमन केले होते. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दुखापतीमुळे हंगामाच्या मध्यातून त्याने माघार घेतली. या दुखापतीमुळे जून महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी संघात त्याला समाविष्ट केले गेले नाही. या सर्वानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड केली गेली. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात आणि वनडे मालिकेत मात्र तो खेळताना दिसला. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यातून तो बाहेर पडला. परंतु, दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी त्याला संघात जागा मिळाली.
इंग्लंड दौऱ्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे आणि टी20 मालिकेत जडेजा खेळताना दिसला. मात्र, त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याचा विचार केला गेला नाही. आता अखेरीस आशिया चषकातील केवळ दोन सामने खेळून त्याला पुन्हा एकदा संघाबाहेर जावे लागले आहे. त्याची ही दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप फारशी माहिती मिळाली नसली तरी, त्याच्या दुखापतीमुळे भारताच्या मिशन टी20 वर्ल्डकप यावर परिणाम होणार नाही याची काळजी भारतीय संघाला असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या पठ्ठ्याने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शानदार शतक! 400 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमदार सुरुवात
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे रवी चमकणार! प्लेइंग 11मध्ये होणार ‘हे’ बदल
विरुष्काचा फोटो वॉर्नरची कमेंट आणि ट्रोलिंग नंतरचं स्पष्टीकरण! वाचा काय आहे प्रकरण