जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या अखेरच्या दिवसाचा खेळ सुरू आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ भिडताना दिसत आहेत. हा अखेरच्या दिवशीचा खेळ सुरू असताना भारतीय संघासाठी खुशखबरी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताच्या रवींद्र जडेजा याने प्रथम स्थान पटकावले.
आयसीसीची नवी क्रमवारी
आयसीसीने दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेनंतर नवीन क्रमवारी जाहीर केले आहे. खेळाडूंच्या क्रमवारीतील अष्टपैलू विभागात भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने एका स्थानाने प्रगती करत अव्वलस्थानी झेप घेतली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील खराब कामगिरीमुळे वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरला आपला पहिला क्रमांक गमवावा लागला. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा बेन स्टोक्स, चौथ्या क्रमांकावर भारताचा रविचंद्रन आश्विन व पाचव्या क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब अल हसन हे कायम आहेत.
होल्डरला झाले नुकसान
कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील खराब कामगिरीमुळे आपले अव्वलस्थान गमवावे लागले. तो या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत केवळ ३४ धावा व ६ बळी घेण्यात यशस्वी ठरला होता. होल्डरला अष्टपैलू क्रमवारीसह गोलंदाजांच्या क्रमवारीत देखील एका स्थानाचे नुकसान झाले असून तो दहाव्या स्थानी घसरला.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फायदा
वेस्ट इंडीजविरूद्धच्या कसोटी मालिकेत मालिकावीर ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक याला फलंदाजी क्रमवारीत फायदा झाला असून तो टॉप टेनमध्ये समाविष्ट झाला. वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा यानेदेखील इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याला पछाडत सहाव्या स्थानावर कब्जा केला. फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन तर, गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर अबाधित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐतिहासिक कसोटीच्या शेवटच्या दिवसासाठी काय असणार किवींची रणनीती? साउदीने केला खुलासा
चाहता म्हणाला, ‘प्लिज विलियम्सनला तंबूत पाठवा’; मग सोनू सूदने आपल्या उत्तरानेच केले बोल्ड
PSL 2021: पोलिसांकडून हैदराबादमधील सट्टेबाजांच्या टोळीचा भांडाफोड, ५ आरोपींना अटक