भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफर आता विदर्भ क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक बनू शकतो. जाफरने ७ मार्चला आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला अलविदा केला आहे. मुंबईनंतर त्याने विदर्भ संघाकडून खेळताना आपल्या कारकीर्दीतील काही वर्षे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली घालविली होती.
वसीम (Wasim Jaffer) आणि चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) यांच्या प्रशिक्षक-खेळाडू जोडीने विदर्भ संघाला २०१७-१८मध्ये रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) आणि २०१८-१९मध्ये ईराणी ट्रॉफीचे (Irani Trophy) विजेतेपद मिळवून दिले होते.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पंडित आता विदर्भ संघ सोडून मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षक बनले आहेत. त्यामुळे आता पंडित यांच्या जागी वसीम जाफरला विदर्भ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्याची जबाबदारी मिळू शकते.
निवृत्ती घेतल्यानंतर जाफर म्हणाला होता की, त्याला प्रशिक्षक व्हायला आवडेल. त्यामुळे असे म्हटले जात आहे की, जाफर आता विदर्भ संघाचा प्रशिक्षक होऊ शकतो. याबद्दल सध्यातरी विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून (Vidarbha Cricket Association) अधिकृतरित्या कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही.
परंतु खेळाडूंसोबत, प्रशासनातही जाफरची प्रतिमा चांगली आहे. म्हणूनच त्याला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
जाफरने याबद्दल बोलताना सांगितले की, या संदर्भात आतापर्यंत त्याच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. जर याबद्दल कोणती चर्चा झाली तर तो यावर विचार करेल.
यावेळी विदर्भ क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष आनंद जयस्वाल (Anand Jaiswal) म्हणाले की, “आतापर्यंत काहीही निश्चित झालेले नाही. कारण कोरोना व्हायरसमुळे त्यांना कोणतीही बैठक घेता आलेली नाही. ते सध्या यावर कोणतेही विधान करु शकत नाहीत की, कोणाचा विचार केला जात आहे आणि कोण बाहेर जाणार आहे. या सर्व गोष्टींवर सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येऊ शकतो.”
४२ वर्षीय जाफरने भारताकडून ३१ कसोटी आणि २ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटी त्याने १९४४ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना २ विकेट्सही घेतल्या आहेत. तर वनडे सामन्यात त्याने केवळ १० धावा केल्या आहेत.
याव्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना त्याने २६० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १९४१० धावा केल्या आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरने सर्वाधिक नाबाद ३१४ धावा केल्या आहेत. तर ११८ अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ४८४९ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही धावला कोरोना बाधितांच्या मदतीसाठी
-जगातील सर्वात उंच ५ क्रिकेटपटू, पहिल्या क्रमांकावरील क्रिकेटपटू उंची ऐकून व्हाल अवाक्
-जगातील १० वेगवान गोलंदाज, ज्यांना तुम्ही म्हणू शकता स्पीडमशीन