पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष तौकीर झिया यांनी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरबद्दल खुलासा केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अख्तरची कारकीर्द २०००मध्येच संपुष्टात आली होती. परंतु बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी अख्तरची कारकीर्द संपुष्टात येण्यापासून वाचवले.
झिया यांनी सांगितले की, “आयसीसीने पीसीबीला १९९९मध्ये म्हटले होते की, अख्तरच्या गोलंदाजी ऍक्शनची चौकशी चालू आहे. त्यावेळी दालमिया १९९७ ते २००० पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. तसेच त्यांचा प्रभावही होता.”
“अख्तरच्या गोलंदाजी ऍक्शनची (Bowling Action) चौकशी चालू होती. त्यादरम्यान दालमिया यांनी त्याची खूप मदत केली होती. आयसीसीचे इतर सदस्य अख्तरच्या गोलंदाजी ऍक्शनला चूकीचे ठरवत होते. परंतु दालमिया यांनी सहकाऱ्यांच्या विरोधात जाऊन अख्तरला पाठिंबा दिला होता,” असेही झिया यावेळी म्हणाले.
“माझ्या आणि दालमिया (Jagmohan Dalmiya) यांच्या पाठिंब्यामुळे आयसीसीने शेवटी वैद्यकीय कायद्यानुसार अख्तरच्या गोलंदाजी ऍक्शनला मंजुरी दिली होती. तसेच यावेळी असे समजले की त्याच्या जन्माच्यावेळी त्याचा कोपरा थोडा जास्तच बाहेर निघाला होता. यानंतर त्याला खेळण्याची परवानगी दिली होती,” असेही झिया यावेळी म्हणाले.
झिया पुढे म्हणाले की, “२००३ च्या विश्वचषकात काही खेळाडूंनी मुद्दाम खराब प्रदर्शन केले होते. विश्वचषकानंतर वसीम अकरम, वकार यूनुस आणि सईद अनवरला संघातून बाहेर करण्यात आले होते.”
“ज्याप्रकारे खेळाडूंनी विश्वचषकात कामगिरी केली होती. त्यामुळे मी निराश झालो होतो. कारण विश्वचषकासाठी जो संघ निवडला होता. तो संघ त्या वेळचा सर्वोत्तम संघ होता. संघातील खेळाडूंमधील चर्चा मी ऐकत होतो. मला तर त्यांच्यावर संशय होता की, आपसातील मतभेदांमुळे काही खेळाडूंनी मुद्दाम खराब कामगिरी केली होती,” असेही झिया (Tauqie Zia) पुढे म्हणाले.
अख्तरने आतापर्यंत एकूण ४५ कसोटी आणि १६३ वनडे सामने आणि १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत एकूण २५.७च्या सरासरीने १७८ विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडेत २४.९८च्या सरासरीने २४७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी२०त १९ विकेट्सचाही समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारतात ५०पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे ५ परदेशी खेळाडू
-८०० विकेट घेणाऱ्या मुरलीधरनला ८० विकेट्सही या कारणाने नसत्या आल्या घेता
-भारताचे दिग्गज क्रिकेटपटू व त्यांनी सुरु केलेली अलिशान हाॅटेल्स