इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव २७८ धावांवर संपला. अनुभवी फलंदाजांच्या हाराकिरीनंतरही भारताने ९५ धावांची आघाडी घेत सामन्यावर पकड बनवली आहे. मात्र, त्याच वेळी भारताच्या डावादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात झटापट झाली. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अशी घडली घटना
भारताच्या पहिल्या डावात मैदानात असलेली मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांची अखेरची जोडी भारतासाठी महत्त्वपूर्ण धावा जोडत होती. जेम्स अँडरसनने टाकलेला ८४ व्या षटकातील अखेरचा चेंडू सिराज फटकावू शकला नाही व चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर, अँडरसन व सिराज आमनेसामने आले. अँडरसन काहीतरी पुटपुटत असताना, सिराज त्याच्या समोर गेला. अँडरसनने त्याला हलकासा धक्का देत पुढे मार्गक्रमण केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
Mohammed Siraj sledging Jimmy Anderson 😂 #ENGvsIND #Anderson #KLRahul pic.twitter.com/YlnVLPyPxP
— Ashwani Pratap Singh (@Ashwaniiisingh) August 6, 2021
Some chattering going on between SIRAJ and Anderson 👀
#ENGvsIND #ENGvIND #INDvENG #INDvsENG #Siraj #anderson #Bumrah pic.twitter.com/efgFrfBDM9
— GURI CHAUDHARY (@GuriChaudhary77) August 6, 2021
सिराज-बुमराहची निर्णायक भागीदारी
भारतीय संघाने आपला नववा गडी मोहम्मद शमीच्या रूपाने २४५ धावांवर गमावला. मात्र, त्यानंतर जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी आक्रमक फटके खेळत संघाच्या धावसंख्येत ३३ धावांची भर घातली. सिराजने नाबाद ७ तर, बूमराहने ३ चौकार व एका षटकाराच्या मदतीने २८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तत्पूर्वी मोहम्मद शमीने देखील १३ धावांचे योगदान दिले होते.
भारतीय संघाची सामन्यावर पकड
इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात अप्रतिम फलंदाजी केली. केएल राहुल व रोहित शर्मा यांनी ९७ धावांची सलामी दिली. मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रवींद्र जडेजाने जबाबदारीने खेळत अर्धशतक झळकावले. तळाच्या फलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान देत भारताला पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी मिळवून दिली. भारतातर्फे सलामीवीर राहुलने सर्वाधिक ८४ धावा बनविल्या. इंग्लंडसाठी युवा ओली रॉबिन्सनने सर्वाधिक ५ तर, अनुभवी जेम्स अँडरसनने ४ बळी आपल्या नावे केले.
महत्त्वाच्या बातम्या –
ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम! केएल राहुलला बाद करत अँडरसन बनला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज
Video: ट्रेंट ब्रिजमध्ये फिरली जडेजाची तलवार, अर्धशतकानंतर केले धमाकेदार सेलिब्रेशन
‘डीके ऑन टूर!’ कॉमेंट्री बॉक्समधून बाहेर पडत दिनेशने लंडनमध्ये चालवली अनोखी स्कूटर; व्हिडिओ व्हायरल