हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्समध्ये सुरू आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंड संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सामन्यात पाऊल ठेवताच दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने दिग्गज भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने गेली अनेक वर्ष इंग्लंड संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच कसोटी क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांमध्ये त्याची गणना होत असते. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत मुरलीधरन आणि शेन वॉर्न नंतर तिसऱ्या स्थानी आहे.
तसेच लीड्स कसोटी सामना हा त्याचा इंग्लंड संघासाठीचा एकूण १६५ वा कसोटी सामना आहे. तर मायदेशातील त्याचा इंग्लंड संघासाठीचा ९४ वा कसोटी सामना आहे. असा कारनामा करत त्याने दिग्गज भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
जेम्स अँडरसनने आतापर्यंत इंग्लंडमध्ये इंग्लंड संघासाठी एकूण ९४ कसोटी सामने खेळले आहेत. सचिन तेंडुलकरने ही भारतीय संघासाठी भारतात एकूण ९४ कसोटी सामने खेळले होते. त्यामुळे मायदेशात आपल्या संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अँडरसन आणि सचिन संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत.
तसेच या यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. पाँटिंगने आपल्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया संघासाठी ऑस्ट्रेलियामध्ये एकूण ९२ कसोटी सामने खेळले होते.(James Anderson equals Sachin Tendulkar in record of most test matches played in a country)
हेडिंग्ले कसोटीत जेम्स अँडरसनची अप्रतिम गोलंदाजी
भारतीय संघाने हेडिंग्ले कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. जेम्स अँडरसनने सुरवातीला केएल राहुलला ० धावांवर माघारी धाडले होते. त्यानंतर चेतेश्वर पुजारालाही अवघी १ धाव करत माघारी धाडले होते.
तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीला ही त्याने जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. विराटला त्याने अवघ्या ७ धावा करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. जेम्स अँडरसनने अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला बॅकफुटवर आणून ठेवले होते. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ४ बाद ५६ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच टॉस जिंकल्याने कर्णधार कोहली शॉक; दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
दहा वर्षात अँडरसनचा टीम इंडियावर चौथा वार! वाचा ही खास आकडेवारी