प्रसिद्ध हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी खेळली जात आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने नियमित अंतराने तीन बळी मिळवत भारतीय संघाची तारांबळ उडवली. यासोबतच अँडरसनने भारतीय संघाविरुद्धची आपली शानदार कामगिरी कायम ठेवली.
पहिल्या षटकात मिळवून दिला बळी
हेडिंग्ले कसोटीत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडसाठी सुरुवात शानदार राहिली. जेम्स अँडरसनने पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर भारताचा सलामीवीर केएल राहुलला यष्टीरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
यासोबतच अँडरसनने भारतीय संघाविरुद्धची एक खास कामगिरी सुरू ठेवली. भारतीय संघाने मागील दहा वर्षात इंग्लंडविरुद्ध चार वेळा पहिल्या षटकात बळी गमावला आहे. विशेष म्हणजे हे चारही बळी जेम्स अँडरसनने मिळवले आहेत. यापैकी तीन वेळा अशी कामगिरी इंग्लंडमध्ये झाली आहे.
हे फलंदाज झाले पहिल्या षटकात बाद
जेम्स अँडरसनने सर्वप्रथम २०१४ दौऱ्यावेळी ओव्हल येथे गौतम गंभीर याला पहिल्या षटकात बाद केले होते. त्यानंतर, २०१८ दौऱ्यावर त्याने मुरली विजयला पहिल्याच षटकात आपले शिकार बनवलेले. तर, यावेळी त्याने राहुलला पहिल्या षटकात बाद केले. तर एकदा त्याने भारतात अशी कामगिरी केली होती.
अँडरसनने मोडले भारतीय संघाचे कंबरडे
हेडिंग्ले कसोटीत जेम्स अँडरसनने आपल्या धारदार गोलंदाजीने भारतीय संघाचे कंबरडे मोडले. त्याने पहिल्या षटकात केएल राहुल तर, पाचव्या षटकात चेतेश्वर पुजाराला माघारी धाडले. भारतीय कर्णधार विराट कोहली हा देखील केवळ सात धावा काढून त्याचा शिकार झाला. चालू मालिकेतील तीन सामन्यांच्या चार डावात दोन वेळा अँडरसनने विराटला तंबूचा रस्ता दाखवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अँडरसनने ओलांडली ‘द वॉल’! द्रविडला मागे सोडत केला ‘हा’ विक्रम
https://mahasports.in/engvsind-3rd-test-1st-day-live-james-anderso-takes-kl-rahul-and-cheteshwar-pujara-wicket/