भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामना खूप रोमांचक आणि खेळाडूंच्या स्लेजिंगने गाजला होता. दरम्यान, टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. श्रीधर यांच्या मते, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची माफी धुडकावली होती, त्यानंतर दोन्ही संघांमधील वाद वाढला होता.
श्रीधर हे आर. अश्विनच्या यूट्यूब चॅनेलवर संवाद साधताना म्हणाले, “बुमराह एक जबरदस्त वेगवान गोलंदाज आहे, त्याला मुद्दाम कोणालाही दुखवायचे नव्हते. बुमराहने यॉर्कर, बाऊन्सर असे 8-10 चेंडू टाकले. त्यामुळे अँडरसन अस्वस्थ होता, पण कसा तरी यातून तो बचावला आणि खेळपट्टीवर तग धरून उभा राहिला. पूर्वी वेगवान गोलंदाजांच्या क्लबमध्ये एक अलिखित नियम होता, तो म्हणजे तुम्ही एकमेकांना बाउन्सर फेकणार नाही. ती एक समज होती, तो काळ आता संपला आहे.’
श्रीधर म्हणाले की, “बुमराह अँडरसनकडे गेला आणि माफी मागितली, पण इंग्लिश गोलंदाजाने त्याला बाजूला केले. श्रीधर म्हणाले,“डाव संपल्यानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परत येत होते. बुमराह जिमीकडे गेला आणि त्याला थाप मारली, त्याला सांगितले की हे जाणूनबुजून नव्हते. बुमराह त्याच्याशी हे बोलून प्रकरण संपवायला गेला, पण जिमीने त्याकडे लक्ष दिले नाही.”
श्रीधर म्हणाले, “यामुळे भारतीय संघ चिडला. संपूर्ण भारतीय संघ एकजूट होत मैदानात उतरला आणि त्याचा परिणाम पाचव्या दिवशी दिसून आला. भारतीय संघाने लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजयाची नोंद केली.”
या सामन्यात दुसऱ्या डावात बुमराहने नाबाद 34 तर मोहम्मद शमीने नाबाद 56 धावा केल्या होत्या. दोघांनी नवव्या विकेटसाठी 89 धावांची नाबाद भागीदारी केली. ज्यामुळे भारताला इंग्लंडसमोर 272 धावांचे आव्हान उभे करता आले. या आव्हाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 120 धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे भारताने लॉर्ड्सच्या मैदानावर 151 धावांनी दुसरी कसोटी जिंकली आणि मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
मंधनापाठोपाठ शेफाली वर्मानेही घेतली ‘द हंड्रेड’ लीगमधून माघार, ‘हे’ आहे कारण
नीरज चोप्रासाठी ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ गाण्यावर थिरकल्या मुली; तर ‘गोल्डन बॉय’ झाला लाजून चूर






