गोवा : हैदराबाद एफसीनंतर जमशेदपूर एफसीलाही (Jamshedpur FC) हिरो इंडियन सुपर लीगच्या (Hero Indian Super League) आठव्या हंगामातील उपांत्य फेरी निश्चित करण्याचे वेध लागलेत. फातोर्डातील पीजेएन स्टेडियमवर शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) होणाऱ्या सामन्यात तळातील नॉर्थ ईस्ट युनायटेड (North East United) एफसीला हरवून अंतिम चार संघांत दिमाखात स्थान मिळवण्याला त्यांचे प्राधान्य असेल.
ताज्या क्रमवारीत जमशेदपूरने १६ सामन्यांत ३१ गुणांसह दुसरे स्थान राखले आहे. पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावण्यासह उपांत्य फेरीवर शिक्कामोर्तब करणाऱ्या हैदराबाद एफसी (१८ सामन्यांत ३५ गुण) आणि त्यांच्यात चार गुणांचा फरक आहे. मात्र, आणखी एका विजयासह टॉपला असलेल्या हैदराबाद आणि त्यांच्यातील फरक अवघ्या एका गुणावर येईल. शुक्रवारच्या लढतीसह जमशेदपूर एफसीचे चार साखळी सामने शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांना सेमीफायनल प्रवेशाची मोठी संधी आहे. मात्र, उर्वरित सामन्यांचा विचार न करता फॉर्मात असलेला जमशेदपूर एफसी तुलनेत कमकुवत नॉर्थ ईस्ट युनायटेडला रोखून प्ले-ऑफ फेरीच्या दिशेने कूच करेल. हैदराबादच्या तुलनेत दोन सामने कमी खेळल्याने जमशेदपूरला अव्वल स्थान मिळवण्याचीही संधी चालून आली आहे.
सांघिक कामगिरीमध्ये कमालीचे सातत्य राखलेत. एका पाठोपाठ एक सामने जिंकलेत. तसेच सर्वाधिक गोल केलेत, असे ऐकायला खूप चांगले वाटते. जमशेदपूरसाठी यंदाचा आयएसएल हंगाम सर्वोत्तम ठरला आहे. आता सातत्य राखून सेमीफायनल निश्चित करण्याचे आमचे पहिले लक्ष्य आहे. मात्र, प्रतिस्पर्ध्याला आम्ही कधीही कमी लेखले नाही. नॉर्थ ईस्ट युनायटेड क्लबची कामगिरी खालावलेली असली तरी तो एक चांगला संघ आहे. त्यांनी बंगलोर एफसी सारख्या अव्वल संघाला मोठ्या फरकाने हरवले. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या कमकुवत बाबींचा न करता आम्ही अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, असे जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्धच्या लढतीच्या पूर्वसंध्येला सांगितले.
जमशेदपूर एफसीने नऊ सामने जिंकलेत. मागील सामन्यात चेन्नईयन एफसीवर मोठ्या फरकाने मात करताना सलग तीन विजय नोंदवलेत. त्यांना आठव्या हंगामात विजयाचा चौकार लगावण्याची संधी आहे. जमशेदपूरने आजवर चार वेळा विजयी हॅटट्रिक साधली असली तरी त्यांना आयएसएलमध्ये सलग चार सामने जिंकता आलेले नाहीत. नायजेरियन फॉरवर्ड डॅनियल चिमा चुक्वुने चार गोल करतानाच पाच गोल असिस्ट करताना हैदराबादची सांघिक कामगिरी उंचावण्यात मोठा वाटा उचलला आहे. त्याचा खेळ महत्त्वपूर्ण ठरेल. मात्र, शुक्रवारी जमशेदपूरला बोरिस आणि जितेंद्र सिंग विना खेळावे लागेल. त्यात जॉर्डन मेर हाही दुखापतग्रस्त आहे.
१८ सामन्यांत केवळ १३ गुण मिळवलेल्या नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र, कामगिरी उंचावताना त्यांना प्ले-ऑफचे गणित बिघडवण्याची संधी आहे. मागील लढतीत बंगलोर एफसीवर मात करताना नॉर्थ ईस्ट युनायटेडने सलग दहा विनलेस सामन्यांची मालिका खंडित केली. त्यामुळे जमशेदपूरला गाफील राहून चालणार नाही. उर्वरित सामन्यांतही खेळ उंचावण्याचा प्रयत्न करू, असे नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचे प्रशिक्षक खालीद जमील यांनी म्हटले आहे. डेशॉर्न ब्राउन फिट असल्याने तसेच मार्सेलिन्हो हा फॉर्मात असल्याचा सांघिक कामगिरी उंचावण्यात फायदा होईल, असे त्यांना वाटते.
आठव्या हंगामातील पहिल्या लढतीत जमशेदपूरने नॉर्थ ईस्ट युनायटेडवर (३-२) मात केली तरी प्रतिस्पर्ध्यांनी झुंजवले. त्यामुळे परतीच्या लढतीची उत्सुकता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या-
केवळ तिलकरत्ने दिल्शानला जमलेला तसा विक्रम न्यूझीलंडच्या एमीलिया केरने केलाय, तोही भारताविरुद्ध
शेन वॉर्नसाठी सचिन नाहीये ‘गॉड ऑफ क्रिकेट’, पाहा कोणाचं घेतलंय नाव
टी२०मध्ये ७००० धावा अन् २०० विकेट्स! पाकिस्तानी क्रिकेटपटूची छोट्या क्रिकेट प्रकारात मोठी कामगिरी