नाशिक | नाशिक शहरात सायकल चळवळ खोलवर रुजवणाऱ्या नाशिक सायकलीस्ट्सचे माजी अध्यक्ष दिवंगत जसपालसिंग विर्दी यांच्या स्मृती जागृत ठेवण्याच्या उद्देशाने टीम जसपालने जसपाल मेमोरियल चॅम्पियनशीप या विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे.
नाशिक सायकलीस्ट्स, नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशन, ओरोबोरस, ग्रेप काँटी यांच्या सहकार्याने येत्या रविवारी, 29 जुलै रोजी नाशिक जवळील त्र्यंबक रस्त्यावरील ग्रेप काँटी रिसॉर्ट परिसरात जसपाल मेमोरियल चॅम्पियनशीप अंतर्गत विविध गटांच्या वैयक्तिक टाइम ट्रायल प्रकारात स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
किड्स, सब ज्युनिअर, ज्युनिअर, कुमार गट आणि खुला अशा एकूण पाच वयोगटात मुली आणि मुले अशा दहा गटांत ही स्पर्धा होणार आहे. वयवर्षे10 ते 13 वयोगटासाठी 9 किमी (चंद्रभागा लॉन्स ते ग्रेप काँटी), 13+ ते 16 वयोगट आणि 16+ ते 20 वयोगटासाठी 15 किमी (चंद्रभागा लॉन्स – अंजनेरी – पुन्हा ग्रेप काँटी), 20+ ते 40 वयोगट आणि यावर्षे 40+ वयोगटासाठी 30 किमी (चंद्रभागा लॉन्स – त्र्यंबकेश्वर पासून 2 किमी पुढे ते पुन्हा ग्रेप काँटी) अशा मार्गांवर या स्पर्धा होणार आहेत. रविवारी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील चंद्रभागा लॉन्स येथे सकाळी ठीक साडेपाच वाजता सर्व स्पर्धकांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या सुरुवात होणाऱ्या ठिकाणी तसेच स्पर्धेच्या मार्गात विविध ठिकाणी हायड्रेशन पॉइंटची व्यवस्था असणार आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेच्या प्रत्येक गटाच्या विजेत्यांना भरघोस बक्षिसे मिळणार असून गटात पहिल्या येणाऱ्या खेळाडूस ट्रॉफीसह रुपये 3000 तर दुसऱ्या खेळाडूस रुपये 2000 तर तिसऱ्या खेळाडूस रुपये 1000 अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ओरोबोरस या आघाडीच्या सायकल उत्पादक कंपनीमार्फत 3 रोड बाईक्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील काळात होणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धांसाठी जे खेळाडू सायकल खरेदी करू शकत नाहीत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात केवळ स्पर्धेसाठी या बाईक्स वापरता येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे, स्वतःची सायकल, सुरक्षिततेसाठी हेल्मेट असणे आवश्यक असून नोंदणी करताना दिल्या जाणाऱ्या महितीपत्रकात सर्व नियम , माहिती समाविष्ट असणार आहे. शनिवार 28 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्पर्धेसाठी अत्यंत नाममात्र शुल्कात नोंदणी करता येणार आहे. नोंदणी फॉर्म्स शिवशक्ती सायकल्स, लुथरा एजन्सीज, भांड सायकल्स, येलो बाईक शॉप, क्लब झेड, ए टू झेड सायकल्स, स्कॉट शोरूम या ठिकाणी उपलब्ध असून यांचेही या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले आहे.
नाशिककरांचे सायकलप्रेम सर्वश्रुत आहे. सायकलिंग कॅपिटल कडे वेगाने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी जसपालसिंग या सायकलवेड्या तरुणांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टीम जसपालकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिककरांसह सर्व नागरिकांसाठी खुल्या असणाऱ्या या स्पर्धेत जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन टीम जसपालने केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मिलिंद वाळेकर,मोहिंदर सिंग, नीता नारंग यांच्यासह टीम जसपालचे सदस्य प्रयत्न करत आहेत.
स्पर्धेबाबत ठळक बाबी :
टॅलेंट हंट आणि होतकरू खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होण्यासाठी तयार करणे,
नाशिक शहरात सायकल चळवळीला आयाम देणे,
जसपाल सिंग विर्दी यांचे स्मरण,
सर्व वयोगटातील खेळाडूंना एकाच स्पर्धेच्या माध्यमातून संधी,
विजेत्यांना भरघोस बक्षिसे
या वयोगटात होणार स्पर्धा :
बाल गट : वयवर्षे 10 ते 13 : 9 किमी (चंद्रभागा लॉन्स ते ग्रेप काँटी),
सब ज्युनिअर : 13+ ते 16 वयोगटासाठी 15 किमी, (चंद्रभागा लॉन्स – अंजनेरी – पुन्हा ग्रेप काँटी),
ज्युनिअर : 16+ ते 20 वयोगटासाठी 15 किमी (चंद्रभागा लॉन्स – अंजनेरी – पुन्हा ग्रेप काँटी),
खुला गट : 20+ ते 40 वयोगटासाठी 30 किमी (चंद्रभागा लॉन्स – त्र्यंबकेश्वर पासून 2 किमी पुढे ते पुन्हा ग्रेप काँटी),
वेटरन गट : 40+ वयोगट 30 किमी : (चंद्रभागा लॉन्स – त्र्यंबकेश्वर पासून 2 किमी पुढे ते पुन्हा ग्रेप काँटी)
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडूंच्या नामांकनात फक्त एकच डिफेंडर
–ला लीगा नव्या हंगामातील रियल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना सामन्यांच्या तारखा जाहीर