मुंबई इंडियन्सनं नुकताच सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादला मुंबईविरुद्ध 7 विकेट्सनी पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, या पराभवानंतरही सनरायझर्स हैदराबादचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत प्रबळ दावेदार आहे. सध्या हैदराबाद गुणतालिकेत 11 सामन्यांत 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्स यानं ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत कमिन्सनं काही रंजक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी कमिन्सनं त्याचा आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण हे देखील सांगितलं.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं सांगितलं की, जसप्रीत बुमराह हा त्याचा आवडता भारतीय क्रिकेटपटू आहे. यावेळी बोलताना कमिन्सनं जसप्रीत बुमराहचं खूप कौतुक केलं. जसप्रीत बुमराहनं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 4 षटकात 23 धावा देत 1 विकेट घेतली होती. या दोन संघांमध्ये या आधी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकात 3 विकेट गमावत 277 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली होती. त्या सामन्यात देखील बुमराहनं 4 षटकात केवळ 36 धावा दिल्या होत्या.
या मुलाखतीत पॅट कमिन्सला सध्याच्या युवा भारतीय खेळाडूंबद्दलही विचारण्यात आलं. यावेळी त्यानं त्याच्या संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याचं नाव घेतलं. अभिषेक या हंगामात हैदराबादसाठी सलामीला येऊन तुफान फलंदाजी करतो आहे.
आयपीएल 2024 मध्ये जसप्रीत बुमराह ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याच्या नावावर 12 सामन्यात 16.50 च्या सरासरीनं 18 विकेट्स आहेत. मात्र, या मोसमात जसप्रीत बुमराहचा संघ मुंबई इंडियन्सची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत केवळ 4 सामने जिंकले आहेत. संघ 12 सामन्यांत 8 गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचं प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
पॅट कमिन्सबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाचा हा वेगवान गोलंदाज 8 मे रोजी 31 वर्षांचा झाला. त्याच्या नेतृत्वात कांगारुंनी गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. या दोन्ही स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा पराभव केला होता. पॅट कमिन्स 2023 मध्ये ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवडला गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये सर्वात जलद 200 षटकार मारणारा भारतीय, संजू सॅमसननं रचला इतिहास!
दिल्ली कॅपिटल्सनं घेतला मागील पराभवाचा बदला, राजस्थानवर 20 धावांनी विजय