ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून टीम इंडियासाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे अत्यंत वेदनेत दिसला. आपल्या स्पेलच्या 20 व्या षटकात बुमराहला मांडीत तीव्र वेदना जाणवल्या आणि तो मैदानावरच बसला. यानंतर डॉक्टर मैदानावर आले आणि त्यांनी त्याचा उपचार केला.
दिलासादायक बाब म्हणजे, काही वेळानंतर बुमराह पुन्हा गोलंदाजी करण्यास सज्ज झाला आणि त्यानं टीम इंडियाचा मोर्चा सांभाळला. टीम मॅनेजमेंटसाठी मात्र ही निश्चितच चिंतेची बाब आहे. बुमराहची दुखापत गंभीर असेल तर भारतीय संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जसप्रीत बुमराह भारताचा मुख्य गोलंदाज असून तो या मालिकेत जबरदस्त फार्मात आहे. अशा परिस्थितीत तो उर्वरित सामन्यांसाठी अनुपलब्ध राहिल्यास भारतीय संघ अडचणीत येऊ शकतो.
ॲडलेड कसोटीत दुखापतग्रस्त झाल्यानंतरही जसप्रीत बुमराहनं गोलंदाजीत आपलं सर्वोत्तम दिलं आणि चार विकेट घेतल्या. त्यानं भारतासाठी 23 षटकं टाकली, ज्यात 61 धावा दिल्या. बुमराहच्या गोलंदाजीत कांगारु फलंदाज संघर्ष करताना दिसले. बुमराहशिवाय मोहम्मद सिराजनंही टीम इंडियाकडून चार विकेट घेतल्या. मात्र, सिराज चांगलाच महागात पडला. त्यानं 24.3 षटकात 98 धावा दिल्या. या दोघांशिवाय नितीश कुमार रेड्डी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतानं पहिल्या डावात 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाचा संघ 337 धावांत ऑलआऊट झाला. अशा प्रकारे पहिल्या डावात यजमान संघाकडे 157 धावांची आघाडी होती. वृत्त लिहेपर्यंत दुसऱ्या डावात भारतीय संघानं 10 षटकांत 2 गडी गमावून 55 धावा केल्या आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाकडे 102 धावांची आघाडी आहे.
हेही वाचा –
आधी सिक्स मग बोल्ड! ट्रॅव्हिस हेडला बोल्ड करताच सिराजचं आक्रमक सेलीब्रेशन, पाहा VIDEO
हा खेळाडू आहे कसोटीत भारताचा सर्वात मोठा ‘शत्रू’! आकडेवारी खूपच खतरनाक
IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडची झंझावती शतकी खेळी, पिंक बाॅल कसोटीत रचला अनोखा इतिहास!