भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्षाच्या अखेरीस पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. याआधी ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आहे. स्मिथने बुमराहला सर्व फॉरमॅटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हटले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने मालिकेची सुरुवात होणार आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाकडून मागील दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. भारताला या संघाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल, तर बुमराहचे योगदान महत्त्वाचे ठरेल. बुमराहसमोर ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी करण्याचे आव्हान असेल. बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत बुमराहने चमकदार कामगिरी करत, पाहुण्या संघाचा पहिला डाव लवकर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
स्मिथने एका मुलाखतीत सांगितले की, “बुमराह उत्तम गोलंदाज आहे. मी त्याचा सामना केला आहे. नवीन चेंडूने असो किंवा जुना चेंडू असो, त्याच्याकडे फलंदाजाला प्रत्येक प्रकारे अडचणीत आणण्याची प्रतिभा आहे. बुमराह तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते.”
स्मिथ गेल्या काही मालिकांपासून सलामी देत आहे आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही स्मिथ याच स्थानावर फलंदाजी करेल, असे मानले जात आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियात सलामीच्या जोडीची चर्चा आहे. स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज असून, त्याने ऑस्ट्रेलिया संघाकडून 109 कसोटी सामने खेळले आहेत. स्मिथच्या कसोटी क्रिकेटमध्ये सध्या 9685 धावा आहेत आणि त्याची नजर भारताविरुद्धच्या कसोटीत 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यावर असेल.
दुसऱ्या बाजूने, बुमराहने जानेवारी 2018 मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून प्रभाव पाडला आहे. त्याने आतापर्यंत 37 सामन्यात 164 विकेट घेतल्या आहेत. या वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने प्रभावी कामगिरी करून, संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्या विजयासाठी कानपूर कसोटीत ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे संधी, मांजरेकरांची मागणी
IND vs BAN: दुसऱ्या सामन्यातही विजय फिक्स? कानपूरच्या मैदानावर भारताची आकडेवारी शानदार
IND vs BAN: पराभवानंतर बांगलादेशला दुसरा झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू होणार बाहेर?