लॉर्ड्स कसोटी सामन्यातील अद्वितीय कामगिरीनंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. पाहुण्या भारताने यजमान इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीत तब्बल १५१ धावांनी दारुण पराभवाची चव चाखवली होती. आता हीच विजयी लय कायम राखत मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचा त्यांचा मानस असेल. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात येता तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.
२७ वर्षीय बुमराह हेडिंग्लेच्या मैदानावर ५ विकेट्स घेत सर्वात जलद १०० कसोटी विकेट्स पूर्ण करण्याची किमया साधू शकतो. त्याने आतापर्यंत २२ कसोटी सामने खेळताना ४३ डावांमध्ये गोलंदाजी करत ९५ विकेट्स चटकावल्या आहेत. त्यामुळे कसोटी विकेट्सचा शतकवीर बनण्यापासून तो केवळ ५ विकेट्सने दूर आहे.
जर त्याने तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या ५ किंवा त्यापेक्षा जास्त फलंदाजांना पव्हेलियनला पाठवण्यात यश मिळवले; तर तो सर्वात वेगाने १०० कसोटीचा आकडा गाठेल. याबरोबरच भारताचे महान वेगवान गोलंदाज कपिल देव यांचा सर्वात जलद १०० विकेट्सचा विक्रमही मोडेल. त्यांनी २५ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. फिरकी गोलंदाजांच्या विभागात आर अश्विनच्या नावे या विक्रमाची नोंद आहे. त्याने केवळ १८ कसोटी सामन्यांमध्ये १०० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
तसे तर, बुमराहसाठी एका कसोटी सामन्यात ५ विकेट्स घेणे ही जास्त अवघड गोष्ट नाही. त्याने आतापर्यंत ५ वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच नुकत्याच इंग्लंडविरुद्ध पहिल्या २ कसोटी सामन्यातही त्याने गोलंदाजीचे चांगले प्रदर्शन केले आहे. दुसऱ्या सामन्यात ३ तत्पूर्वी पहिल्या सामन्यात ९ विकेट्स असे त्याचे इंग्लंड दौऱ्यावरील आतापर्यंतचे प्रदर्शन राहिले आहे.
त्यामुळे बुमराह येत्या तिसऱ्या सामन्यात ५ विकेट्स घेण्यात यशस्वी होत इतिहास रचेल की नाही?, याकडे सर्वांच्या नजरा असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
वुडच्या बदली खेळाडूने भारतीयांची वाढवली धडधड! ‘या’ अप्रतिम कामगिरीने गाजवलंय लीड्सचं मैदान
स्वत: द्रविडचीच भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यास अनिच्छा, बीसीसीआय अधिकाऱ्याने दिले संकेत
भारतीय संघाचं माहीत नाही, पण आम्ही पूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रित करणार आहोत- जो रूट