भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यातील काही कडवट आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने सांगितले आहे की निवडकर्त्यांनी त्याला जबरदस्तीने विश्रांती घेण्यास सांगितले होते.
2003च्या विश्वचषकानंतर निवृत्ती घेतलेल्या श्रीनाथने खूलासा केला की बीसीसीआयला वाटत होते की त्याने 2002 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान विश्रांती घ्यावी. परिणामी श्रीनाथला इंग्लंडच्या दौऱ्यालाही मुकावे लागले होते.
स्पोर्ट्सकिडाने दिलेल्या वृत्तानुसार श्रीनाथ म्हणाला, ‘मला वाटते विश्वचषकाआधी आम्ही वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. मला काही न विचारता निवडकर्त्यांनी मला सांगितले की मी विश्रांती घ्यायला पाहिजे.
सहसा आमचे संभाषण व्हायचे आणि मग मी स्वतःच्या इच्छेने सांगायचो की, ‘मला विश्रांती हवी आहे’. पण यावेळी ते फक्त म्हणाले ‘आम्ही तूला विश्रांती देत आहोत’ आणि माझ्याबरोबर असे कधी झाले नाही. मी थोडा चिंताग्रस्त होतो. माझी कारकिर्द कोणाच्याही हातात जाऊ नये अशी माझी इच्छा होती.’
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात श्रीनाथचा समावेश नव्हता. त्यावेळी तो कौऊंटी क्रिकेट खेळायला गेला होता. याबद्दल सांगताना श्रीनाथ म्हणाला की त्याला त्यावेळीचा भारताचा कर्णधार सौरव गांगुलीने संपर्कही साधला होता.
गांगुलीने त्याला संघात सामील होण्यास सांगितले होते. पण नाराज झालेल्या श्रीनाथने गांगुलीची ही विनंती नाकारली होती. पण यानंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यातून श्रीनाथने भारतीय संघात पुनरागमन केले तसेच दक्षिण आफ्रिकेत झालेला 2003 चा विश्वचषकही खेळला. या विश्वचषकात श्रीनाथने 11 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या होत्या.
याबद्दल सांगताना श्रीनाथ म्हणाला, ‘मी इंग्लंड दौऱ्याला मुकलो. नक्कीच मला गांगुलीने फोन केला होता आणि तो मला म्हणाला होता, ‘हे बघ तू इंग्लंड दौऱ्याचा भाग व्हावास.’ मी नाराज होतो आणि मी त्याला सांगितले, ‘नाही, मी येणार नाही’.
आता जेव्हा मी विचार करतो तेव्हा वाटते की मी कौउंटी क्रिकेट खेळण्यापेक्षा भारतासाठी खेळायला हवे होते. जेव्हा नंतर सर्व शांत झाले, तेव्हा मी पुनरागमन करण्याचे ठरवले. मला विश्वचषक खेळायचा होता. प्रत्येक विश्वचषक ही एक पीढी असल्यासारखा होता.’
‘भारतातील माझी शक्ती कमी होत चालली होती आणि तेथे भुकेले वेगवान गोलंदाज होते. त्यामुळे मला त्यांचा मार्ग रोखायचा नव्हता. मी आनंदी होतो. मला कोणत्याही गोष्टीचे दु:ख नाही. सन्मानाने बाहेर पडणे कधीही चांगले असते.’
श्रीनाथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 296 सामन्यांमध्ये 551 विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
यष्टीरक्षक धोनीने इतके विक्रम केले मात्र हा विक्रम राहुनच गेला
हरभजन म्हणतो, त्या घटनेमुळे ऑस्ट्रेलियाई मीडियाने मला मायकल जॅक्शन बनवले होते
आख्ख्या चेन्नई सुपर किंग्जच्या चप्पल दुरूस्त करणाऱ्याला इरफानची मदत