नुकतेच जय शहांची आयसीसीचे (ICC) नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांनी आधीच तिसरी टर्म घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारताचा जय शहा वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. शहांनी फार कमी वेळात एवढं मोठं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे अनेकदा मनात प्रश्न पडतो की ते क्रिकेट क्षेत्रात आले कसे? तर मग या बातमीद्वारे जाणून घेऊयात जय शहांचा क्रिकेटमधील प्रवास कसा आहे?
जय शहा लहानपणापासूनच क्रिकेट प्रशासनाशी संबंधित होते. 2009 मध्ये ते फक्त 21 वर्षांचा होते जेव्हा ते सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट (अहमदाबाद) च्या कार्यकारी मंडळाचे सदस्य झाले. हळूहळू क्रिकेट प्रशासनातील त्यांचा दर्जा वाढत गेला. त्यानंतर केवळ चार वर्षांनी म्हणजे 2013 मध्ये त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) मध्ये संयुक्त सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी जय शहांचे वडील अमित शाह गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) अध्यक्ष होते. जीसीएचे सहसचिव पदावर असताना जय शहांनी बांधकामाचे काम पाहिले. ज्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पुनर्बांधणीचाही समावेश होता.
जय शाह नंतर 2015 मध्ये बीसीसीआयमध्ये (BCCI) ‘वित्त आणि विपणन समिती’चे (Finance and Marketing Committee Committee सदस्य बनले. 2015-2019 दरम्यान त्यांनी हा कार्यकाळ संभाळला. मागील कार्यकाळ संपल्यानंतर 2019 मध्ये ते बीसीसीआयच्या इतिहासातील सर्वात तरुण सचिव म्हणून निवडले गेले. 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची सचिव म्हणून पुन्हा निवड झाली आणि त्यांचा सध्याचा कार्यकाळ वर्षाखेरीस संपेल.
जय शहांचा मागील 15 वर्षाचा प्रवास
2009-2013: गुजरात क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी मंडळ सदस्य
2013-2015: गुजरात क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव
2015-2019: बीसीसीआय फायनान्स आणि मार्केटिंग कमिटी
2019-2024: बीसीसीआय सचिव
2024- पुढे : आयसीसी अध्यक्ष
बीसीसीआयचे सचिवपद सांभाळताना जय शहांनी 2021 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्षपदही स्वीकारले. शाह यांचा कार्यकाळ 2024 च्या सुरुवातीला संपला. पुढील आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष श्रीलंकेतून निवडला जाणार होता. पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी जय शाह यांच्या पदावर कायम राहण्याच्या समर्थनार्थ मत दिले होते.
जय शहा आता वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी आयसीसीचे अध्यक्ष बनणार असून त्यांचा कार्यकाळ 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या पाच जणांनी अध्यक्षपद भूषवले आहे. सध्या आयसीसी चेअरमन असण्यासोबतच शाह हे बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळतील.
हेही वाचा-
आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून जय शहांची निवड; कधी, किती दिवस पदभार सांभाळणार?
संपुर्ण यादीः आयसीसीचे आजपर्यंतचे भारतीय प्रमुख, जय शहा सर्वात तरुण
“बुमराहकडे पाहा…” पराभवानंतर माजी खेळाडू पाकिस्तानी गोलंदाजांवर भडकला