इंग्लंडने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत २-० अशा फरकाने निर्भेळ यश मिळाले. या मालिकेनंतर आता इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्यावर येणार आहे. या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
या मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे भारताच्या बलाढ्य फलंदाजीला रोखण्याचे प्रमुख आव्हान असेल, असे मत श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने याने मांडले आहे. विशेषतः इंग्लंडचे अननुभवी फिरकी गोलंदाज कशी कामगिरी करतात यावर मालिकेचे भवितव्य अवलंबून असेल, असेही जयवर्धने म्हणाला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयवर्धने म्हणाला, “माझ्या मते ही अतिशय रंगतदार मालिका होईल. खेळाडूंसाठी हे एक आव्हान असेल. क्रिकेटमध्ये हीच गंमत आहे. तुम्हाला परदेशात जाऊन मालिका जिंकायची असते. श्रीलंकेतील मालिकेने इंग्लंडच्या फिरकीपटूंना चांगला अनुभव मिळाला असेल. मात्र भारतातील मालिका त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.”
यावेळी जयवर्धनेने इंग्लंडला मालिकेत विजयाची चांगली संधी असल्याचेही मत मांडले. विशेषतः बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरच्या येण्याने इंग्लंडचा संघ मजबूत झाला असल्याचे जयवर्धनेने सांगितले.
तो म्हणाला, “बेन स्टोक्सच्या येण्याने इंग्लंडच्या फलंदाजीत एका अनुभवी फलंदाजाचा समावेश होईल. तसेच या क्रमात एक डावखुरा फलंदाज सामील झाल्याचाही फायदा होईल. तसेच भारताच्या धीम्या गतीच्या खेळपट्ट्यांवर जोफ्रा आर्चरची गती परिणामकारक ठरेल.”
जयवर्धनेने यावेळी जॉनी बेअरिस्टोला संघात स्थान न दिल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. बेअरिस्टोने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते पाहून तरी त्याला संघात स्थान द्यायला हवे होते, असे जयवर्धने म्हणाला.
महत्वाच्या बातम्या:
होय, पक्काच..! चेन्नईतील पहिल्या कसोटीत टीम इंडियाच जिंकणार? असं आम्ही नाही हे आकडे सांगतायेत
सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडेल जो रूट, माजी दिग्गजाची भविष्यवाणी






