Jeffrey Vandersay :- श्रीलंकेविरुद्धचा पहिला वनडे सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान संघाच्या खेळाडूंनी फलंदाजीसह गोलंदाजीतही दमदार प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने 9 बाद 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने वेगवान सुरुवात केली, मात्र श्रीलंकेचा फिरकीपटू जेफ्री वँडरसेने भारतीय संघाला बॅकफूटवर आणले. भारताचा संघ 42.2 षटकांतच 208 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेने 32 धावांनी हा सामना जिंकला आणि मालिकेत आघाडी घेतली.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवरील फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर जेफ्री वँडरसेचा जलवा पाहायला मिळाला. श्रीलंकेच्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने वेगवान सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 97 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 44 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. त्याने डावाला चांगली सुरुवात मिळवून दिली. पण जेफ्री वँडरसेच्या वादळाने भारताचा डाव गडगडला. जेफ्री वँडरसेच्या चेंडूवर रोहित रिव्हर्स स्वीप खेळताना झेलबाद झाला. त्यानंतर शुबमन गिल 35 धावांवर झेल देवून बसला.
पुढे विराट कोहली (14), शिवम दुबे (0) आणि श्रेयस अय्यर (7) या तिघांनाही जेफ्री वँडरसेने पायचीत केले. त्यानंतर अनुभवी केएल राहुल तरी भारतीय संघाचा डाव सांभाळेल अशी अपेक्षा होती. परंतु जेफ्री वँडरसेने दुसऱ्याच चेंडूवर राहुलचा त्रिफळा उडवला. राहुल शून्य धावेवर पव्हेलियनला परतला. अशाप्रकारे संपूर्ण सामन्यात जेफ्री वँडरसेने 10 षटके गोलंदाजी करताना केवळ 33 धावा दिल्या आणि एकूण 6 विकेट्स घेतल्या.
जेफ्री वँडरसेव्यतिरिक्त कर्णधार चरिथ असलंकाने 3 विकेट्स काढल्या. 6.2 षटके फेकताना 20 धावा देत त्याने या विकेट्स मिळवल्या. याव्यतिरिक्त श्रीलंकेच्या कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळवला आली नाही. या सामन्यात अलिक धनंजयाने सर्वाधिक 54 धावा खर्च केल्या. तर दुनिथ वेल्लालगेनेही 41 धावा लुटल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट बाद होता की नाबाद? डीआरएसवरून मोठा गोंधळ, श्रीलंकन खेळाडूंच्या प्रतिक्रियेनेही वेधले लक्ष
Video : रोहितचा थ्रो हुकला, पण विराटने चित्त्याप्रमाणे चपळता दाखवत श्रीलंकेच्या फलंदाजाला केले रनआऊट
“त्याला भारी वाटायचं जेव्हा मी…” फ्रेंडशिपडेच्या दिवशी धवनला आली जुन्या जोडीदाराची आठवण..!