Ishan Kishan :- सध्या तमिळनाडू येथे बूची बाबू निमंत्रित क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक खेळाडू देखील खेळताना दिसत आहेत. त्याचवेळी सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर असलेला ईशान किशन हा देखील झारखंड संघाचे या स्पर्धेत नेतृत्व करतोय. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने आता निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांच्या समोरील डोकेदुखी वाढली आहे.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ईशान हा थेट गोलंदाजी करताना दिसला. त्याचा गोलंदाजीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहिल्या सामन्यात त्याने उत्कृष्ट नेतृत्व, चपळ यष्टीरक्षण व आक्रमक फलंदाजी करत सर्वांकडून कौतुक वसूल करून घेतले होते. दुसऱ्या सामन्यात मात्र त्यांना हैदराबादविरूद्ध पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात झारखंड संघाची कामगिरी विशेष राहिली नाही आणि संघाला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात ईशानलाही फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. सामन्यात 64 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या ईशानने रवी तेजाला राऊंड द विकेट ऑफ स्पिन गोलंदाजी केली. त्याने एकूण 2 षटके टाकली आणि 5 धावा दिल्या. मात्र, त्याला यश मिळाले नाही. तसेच, त्याने सामन्याच्या पहिल्या डावात 1 धावा आणि दुसऱ्या डावात 5 धावा केल्या. ईशानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएलमध्ये गोलंदाजी केलेली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 5 षटके टाकताना 3.8 च्या इकॉनॉमीने 19 धावा दिल्या आहेत.
Ishan Kishan bowling in domestic cricket vs HCA. pic.twitter.com/dH6SqOHYCK
— KaMouFlaZe (NITian) (@kanha_iya_) August 23, 2024
बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या ईशानने बुची बाबू निमंत्रित स्पर्धा खेळून पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेशविरुद्ध त्याने झंझावाती शतक झळकावले होते. या खेळीत ईशानने 9 षटकार ठोकलेले. यानंतर याच सामन्यात झारखंडच्या कर्णधाराने सामना जिंकवणारी खेळी केली. ईशानने यावर्षी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याला बीसीसीआयचा केंद्रीय करारही मिळालेले नाही. आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ईशानचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा –
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी डेंग्यूतून सावरला वेगवान गोलंदाज, दुलीप ट्रॉफीत खेळणार
इंग्लंड क्रिकेटला मिळाला नवा स्टार खेळाडू! श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून मोडला 94 वर्ष जुना विक्रम
ऑस्ट्रेलियाकडून खेळणार भारतीय वंशाच्या 3 क्रिकेटपटू, ‘या’ क्रिकेट मालिकेत घडणार नवीन पराक्रम