भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आज इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाला असल्याची घोषणा केली. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओत धोनीचे आवडते ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ हे गाणे वाजत आहे.
त्याच्या निवृत्तीनंतर क्रिकेट क्षेत्रातूनच नाही तर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही प्रतिक्रिया देताना धोनीला एक निवृत्तीचा सामना (फेअरवेल मॅच) देण्याची मागणी केली आहे.
झारखंडमधील रहिवासी असलेला धोनी निवृत्त झाल्यानंतर हेमंत यांनी ट्विट केले की ‘देशाला आणि झारखंडला कित्येक अभिमानाचे आणि उत्साहाचे क्षण देणारा माही आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आपल्या सर्वांच्या आवडत्या झारखंडचा लाल माही निळी जर्सी परिधान केलेला आपल्याला दिसणार नाही. पण देशवासीयांचे हृदय अद्याप पूर्ण भरलेले नाही. माझा वाटते की आपल्या माहीचा रांचीमध्ये निवृत्तीचा सामना व्हावा, ज्याचा साक्षीदार पूर्ण जग असेल. मी बीसीसीआयला विनंती करतो की धोनीसाठी एक निवृत्तीचा सामना व्हावा, ज्याची यजमानपद पूर्ण झारखंड सांभाळेल.’
देश और झारखण्ड को गर्व और उत्साह के अनेक क्षण देने वाले माही ने आज अंतराष्ट्रीय क्रिकेट से सन्यास ले लिया है।हम सबके चहेते झारखण्ड का लाल माही को नीली जर्सी पहने नहीं देख पायेंगे।पर देशवासियों का दिल अभी भरा नहीं। मैं मानता हूँ हमारे माही का एक फ़ेयरवेल मैच राँची में हो जिसका 1/2 pic.twitter.com/XFt5zBSvG8
— Hemant Soren (@HemantSorenJMM) August 15, 2020
गवाह पूरा विश्व बनेगा।
.@BCCI से अपील करना चाहूँगा हूँ माही का एक फेयरवेल मैच कराया जाये जिसकी मेजबानी पूरा झारखण्ड करेगा। 2/2
— Hemant Soren (@HemantSorenJMM) August 15, 2020
धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 6 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कसोटीत धोनीच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने 2013 मध्ये चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 224 धावांची खेळी केली होती.
तसेच धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारताचा सचिन तेंडूलकर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. धोनीने त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 350 वनडे सामने खेळले असून यात त्याने 10 शतके आणि 73 अर्धशतकांसह 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताकडून धोनीने 98 टी20 सामन्यात 2 अर्धशतकांसह 1617 धावा केल्या आहेत.






