इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून 2019 विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. परंतू केवळ 3 आठवड्यांचा कालावधी राहिलेल्या या स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन खांद्याच्या दुखापतीमुळे 2019 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
त्याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाने 28 वर्षीय केन रिचर्डसनचा 2019 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या 15 जणांच्या संघात समावेश केला आहे.
झायला संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान खांद्याची दुखापत झाली होती. पण तरीही तो विश्वचषकाआधी बरा होईल या आशेवर त्याचा विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला होता.
मात्र ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकीय स्टाफने नुकत्याच केलेल्या त्याच्या तपासणीमध्ये आणि स्कॅनमध्ये दिसून आले की तो विश्वचषकापर्यंत पूर्ण बरा होऊ शकत नाही.
त्याच्या दुखापतीबद्दल ऑस्ट्रेलिया संघाचे फिजिओ म्हणाले, ‘ही बातमी संघासाठी आणि झायसाठी नक्कीच निराशाजनक आहे. त्याच्या नुकत्याच केलेल्या तपासणीमध्ये आणि ने़टमधील गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नानंतर हे स्पष्ट झाले आहे की आवश्यक तेवढ्या वेगाने तो दुखापतीतून बाहेर येत नाही. त्यामुळे निवडकर्त्यांशी केलेल्या चर्चेनंतर, आम्ही त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’
‘झाय त्याचे रिहाबिलिटेशन कायम ठेवेल आणि तो पुढील काही आठवड्यात पुन्हा गोलंदाजी करेल. सध्या आम्ही आशावादी आहोत की तो जूनमध्ये असणाऱ्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध होईल.’
22 वर्षीय झायने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून 12 वनडे सामने खेळले होते. यात त्याने 24 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याचा बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आलेल्या केन रिचर्डसनने आत्तापर्यंत 20 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 29 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा 2019 विश्वचषकातील पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध 1 जूनला बिस्ट्रोल येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएल आता आयआयटीच्या परिक्षेत! धोनीने काय निर्णय घ्यावा, असा विद्यार्थ्यांना प्रश्न…
–दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, २०१९ विश्वचषकाला मुकणार हा वेगवान गोलंदाज
–स्टिव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून पुनरागमन करत एका हाताने घेतला शानदार झेल, पहा व्हिडिओ






