---Advertisement---

जो रुट ठरला बुमराह, आफ्रिदीला भारी; जिंकला ऑगस्ट महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार

On: सोमवार, सप्टेंबर 13, 2021 4:24 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दरमहिन्याला पुरुष आणि महिला गटात सर्वोत्तम खेळाडूचा (प्लेअर ऑफ द मंथ) पुरस्कार दिला जातो. यंदा ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटला, तर सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार आर्यलंडच्या इमियर रिचर्डसन हिला जाहीर झाला आहे.

रुटने बुमराह, अफ्रिदीला टाकले मागे
ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठी रुटसह भारताचा वेगावान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी यांना नामांकन मिळाले होते. पण बुमराह आणि आफ्रिदी या दोघांनाही मागे टाकत रुटने पुरस्कार जिंकला आहे.

रुटने ऑगस्ट महिन्यात भारताविरुद्ध ३ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने इंग्लंडचे नेतृत्व करताना ३ शतकं ठोकली. यासह त्याने १२६.७५ च्या सरासरीने ५०७ धावा केल्या. एवढेच नाही तर त्याने कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत केन विलियम्सनला मागे टाकत अव्वल क्रमांकही पटकावला. त्याने लॉर्ड्स कसोटीत १८० धावांची खेळी केली होती. त्याच्या या कामगिरीने त्याला पुरस्कार मिळवून दिला आहे.

या पुरस्कारासाठी शर्यतीत असलेल्या बुमराहने इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट महिन्यात खेळल्या गेलेल्या ३ कसोटी सामन्यांत २०.०७ च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने लॉर्ड्स कसोटीत फलंदाजीतही कमाल करताना मोहम्मद शमीसह नाबाद ८९ धावांची भागीदारी केली होती.

तसेच शाहिन आफ्रिदीने ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २ कसोटीत १८ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने दुसऱ्या कसोटीत १० विकेट्स घेतल्या होत्या, असा कारनामा करणारा तो पाकिस्तानचा चौथ्या क्रमांकाचा युवा गोलंदाज ठरला होता.

इमियर रिचर्डसनने संघसहकारी गॅबी लेविसला टाकले मागे
ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणाऱ्या इमियर रिचर्डसनने ऑयर्लंडच्याच गॅबी लेविस आणि थायलंडच्या नताया बुचाथमला मागे टाकले. रिचर्डसनने ऑगस्ट महिन्यात आयसीसी महिला टी२० विश्वचषकत युरोप क्वालिफायर स्पर्धा खेळताना अष्टपैलू प्रदर्शन केले होते.

तिने या स्पर्धेत जर्मनी, स्कॉटलंड, फ्रान्स आणि नेदलँड्सविरुद्ध सामने खेळताना ७ विकेट्स घेतल्या आणि ७६ धावा केल्या होत्या.

अशा पद्धतीने दिले जातात पुरस्कार 
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येते. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येते.

आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतात.

व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करते. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतात. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना ९० टक्के तर चाहत्यांच्या मतांना १० टक्के प्राधान्य असते. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्‍या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या – 

पत्नीच पतीचं पाठबळ!! खराब फॉर्मशी झगडत असताना धनश्रीने ‘असा’ वाढवला चहलचा आत्मविश्वास

शास्त्रींचा पुस्तक प्रकाशन सोहळा की आयपीएल? अंतिम कसोटी रद्द होण्यामागील खऱ्या कारणाचा गांगुलीकडून खुलासा

मंकडिंग क्विन…! पदार्पणाच्या सामन्यात १६ वर्षीय क्रिकेटरने मंकडिंग पद्धतीने ४ फलंदाजांना धाडले तंबूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---