चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना इंग्लंडने मंगळवारी(९ फेब्रुवारी) २२७ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने द्विशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच रुटला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. त्यामुळे त्याने एक खास विक्रम केला आहे.
रुटने कसोटीत सलग तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्याने याआधी जानेवारी २०२१ मध्ये इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्यात झालेल्या २ कसोटी सामन्यात देखील सामनावीर पुरस्कार जिंकला होता. त्यावेळी त्याने श्रीलंका विरुद्ध पहिल्या सामन्यात २२८ धावांची द्विशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात १८६ धावांची शतकी खेळी केली होती.
त्यामुळे तो कसोटीमध्ये सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवणारा सातवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी मुथय्या मुरलीधरन, इयान बॉथम, वासिम आक्रम, स्टीव्ह हार्मिसन, जॅक कॅलिस आणि मायकल हसी यांनी हा पराक्रम केला आहे. यातील केवळ मुथय्या मुरलीधरनने सलग ४ वेळा कसोटीत सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. तर बाकीच्यांनी सलग तीनवेळी सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. Joe Root became seventh players to win Three or More consecutive “Player of the Match” Awards
कारकिर्दीतील ९८ व्या, ९९ व्या आणि १०० व्या कसोटीत शतक –
श्रीलंकेविरुद्धचे दोन सामने आणि भारताविरुद्धचा चेन्नईत झालेला पहिला कसोटी सामना हे रुटचे कारकिर्दीतील अनुक्रमे ९८ वा, ९९ वा आणि १०० वा कसोटी सामने होते. त्यामुळे रुट हा कारकिर्दीतील ९८ व्या, ९९ व्या आणि १०० व्या कसोटीत १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
भारताविरुद्ध द्विशतक –
चेन्नईत झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान रुटने पहिल्या डावात ३७७ चेंडूत २१८ धावा केल्या. या खेळीत रुटने १९ चौकार आणि २ षटकार मारले.
सलग तीन कसोटीत सामनावीर पुरस्कार जिंकणारे क्रिकेटपटू –
२००१ – मुथय्या मुरलीधरन (सलग ४ वेळा)
१९८१ – इयान बॉथम
२००० – वासिम अक्रम
२००४ – स्टीव्ह हार्मिसन
२००७ – जॅक कॅलिस
२०११ – मायकल हसी
२०२१ – जो रुट
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलाव २०२१ : स्टीव स्मिथ ठरू शकतो सर्वात महागडा खेळाडू, ‘या’ तीन संघात होणार रस्सीखेच
कसोटी क्रमवारी: जेम्स अँडरसनची तिसऱ्या स्थानी झेप; अश्विन, बुमराह ‘या’ क्रमांकावर
आयसीसी कसोटी क्रमवारी : विराट कोहलीची ‘या’ स्थानी घसरण, तर जो रूटची दोन स्थानांनी प्रगती