भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने १५० धावांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी सलग तिसऱ्या कसोटीमध्ये रुटने १५० धावांचा आकडा ओलांडला आहे. श्रीलंकाविरुद्धच्या २ कसोटीत त्याने द्विशतक आणि दीडशतक केले होते. यासह कसोटीतील मोठ्या विक्रमाच्या यादीत रुटने स्थान मिळवले आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग तीन कसोटी सामन्यात १५० हून अधिक धावा करणारा रुट सातवा फलंदाज ठरला आहे. रुटच्या आधी कुमार संगकारा, व्हॅली हमन्ड, सर डॉन ब्रॅडमन, झहीर अब्बास, मुद्दसर नजर आणि टॉम लॅथम यांनी हा किर्तीमान नोंदवला होता. यातील संगकारा हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने सलग ४ कसोटी सामन्यात १५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
सलग ३ किंवा जास्त कसोटी सामन्यात १५०+ धावा करणारे फलंदाज-
४ वेळा- कुमार संगकारा (२००७)
३ वेळा- व्हॅली हमन्ड (१९२८-२९)
३ वेळा- डॉन ब्रॅडमन (१९३७)
३ वेळा- झहीर अब्बास (१९८२-८३)
३ वेळा- मुदस्सर नजर (१९८३)
३ वेळा- टॉम लॅथम (२०१८-१९)
३ वेळा- जो रुट (२०२१)
पहिल्या डावात इंग्लंड मजबूत स्थितीत
भारत आणि इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा आज (०६ फेब्रुवारी) दुसरा दिवस चालू आहे. इंग्लंडने ३ बाद २६३ धावांपासून पुढे दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला आहे. पहिल्या दिवशी सलामीवीर रॉरी बर्न्स ३३ धावा, डॉम सिब्ले ८७ धावा आणि डॅनियल लॉरेन्स शून्य धावांवर बाद झाले होते. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत बेन स्टोक्स ८२ धावांवर झेलबाद झाला. मात्र कर्णधार जो रूट नाबाद १८३ धावांवर खेळत आहे. ओली पॉप फलंदाजीसाठी मैदानावर उतरला आहे. यासह इंग्लंडने दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रापर्यंत ४ बाद ४१६ धावा फलकावर नोंदवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या कॅप्टनचा दीडशतकी धमाका, ब्रॅडमन यांच्या ८४ वर्षांपुर्वीच्या विक्रमाची केली पुनरावृत्ती
क्रिकेट.. क्रिकेट.. आणि फक्त क्रिकेटच, पाहा पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक






