इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने २०२१ मध्ये १३९८ कसोटी धावा केल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जगातील एकही फलंदाज ७५० धावांचा टप्पाही पार करू शकला नाही. यावरून रूटची कामगिरी आपण समजू शकतो. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी १२१ धावा केल्यावर रूट बाद झाला. त्याने मालिकेच्या सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले. त्याच्या खेळीमुळेच इंग्लंड संघ तिसऱ्या कसोटीत मजबूत स्थितीमध्ये आहे.
२०२१ रूटच्या नावे
जो रूटने २०२१ मध्ये, ११ कसोटी सामन्यांच्या २१ डावांमध्ये ७० च्या सरासरीने १३९८ धावा केल्या आहेत. यात ६ शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट ५८ चा राहिला असून त्याने २२८ धावांची सर्वात मोठी खेळीही साकारली आहे. सध्याच्या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर आता रूटला ५ डावात फलंदाजी करण्याची संधी मिळालीये. त्याचा हा फॉर्म असाच राहिला तर, रूट एका वर्षात कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो.
मोहम्मद युसूफचा विक्रम निशाण्यावर
एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद युसूफच्या नावावर आहे. त्याने २००६ मध्ये ११ कसोटींच्या १९ डावांमध्ये ९९ च्या सरासरीने १७८८ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने ९ शतके आणि ३ अर्धशतके ठोकलेली. अशा परिस्थितीत जो रूट आता मोहम्मद युसूफपेक्षा फक्त ३९० धावांनी मागे आहे. या वर्षात जर त्याने आणखी ३९१ धावा केल्या तर तो एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.
बनला इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज
तिसऱ्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर जो रुटने इंग्लिश फलंदाज म्हणून मोठा विक्रम केला आहे. इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही प्रकारामध्ये सर्वाधिक शतके करणारा तो फलंदाज बनला. रूटच्या खात्यावर आता ३९ शतके आहेत. त्याने माजी कर्णधार ऍलिस्टर कुकला मागे सोडले आहे. कुकने ३८ शतके केली होती. याशिवाय केविन पीटरसनच्या नावावर ३२ शतके आहेत. इतर कोणत्याही इंग्लिश फलंदाजाने ३० शतकांचा टप्पा गाठलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
यशस्वी जयस्वालच्या धमाक्याने मुंबईची ओमानवर मात, मालिकेत केली बरोबरी
‘मुंबई इंडियन्स साधणार विजेतेपदाची हॅट्रिक, भारतही जिंकेल टी२० विश्वचषक’, हार्दिक पंड्याचा विश्वास
केविन पीटरसनला भविष्यवाणी पडली महागात, वसीम जाफरने घेतली ‘अशी’ फिरकी