ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. अगामी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार हे जवळपास निश्चित आहे.
भारतीय संघासाठी या दौर्यात जो रूटचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. रुटला स्टीव स्मिथ, विराट कोहली आणि केन विलियम्सन प्रमाणे जगातील सर्वोत्तम खेळाडू मानले जाते. या चौघांना सध्याच्या काळातील फॅब फोर असेही संबोधले जाते. मात्र, स्वतः रुटने आपण या तिघांच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रुट म्हणाला, “तुम्ही जगातील सर्वोत्तम खेळाडूंबद्दल बोलत आहात. ते तिघेही( स्मिथ, कोहली, विलियम्सन) शानदार खेळाडू आहेत व त्यांना खेळताना बघणे आनंददायी असते. त्या तिघांकडूनही तुम्ही रोज शिकत असतात. मला नाही वाटत की मी स्वतः त्यांच्या इतका महान आहे.”
रुट सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेत त्याने आपले फलंदाजी कौशल्य संपूर्ण जगाला दाखवून दिले. इंग्लंडने श्रीलंकेत ऐतिहासिक मालिका विजय मिळवला व इंग्लंडच्या या मालिका विजयाचा नायक रुट ठरला.
रुटने पहिल्या कसोटी सामन्यात 321 चेंडूंचा सामना करत 228 धावांची शानदार खेळी केली. तसेच दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील 186 धावा ठोकल्या. रुटच्या या अविश्वसनीय खेळींमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला. इंग्लंडच्या समर्थकांना आशा असेल की तो आगामी काळात भारताविरुद्ध देखील उत्तम कामगिरी करेल.
इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना अशा असणार आहे.
भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीनेही ही मालिका महत्त्वाची असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvsENG : ‘असा’ आहे चेन्नई कसोटीचा इतिहास; पाहा टीम इंडियाने जिंकले किती सामने
खराब फॉर्मातून सावरण्यासाठी ‘ही’ गोष्ट करतो, कुलदीप यादवने केला उलगडा
आता ‘या’ स्पर्धेत खेळणार अर्जुन तेंडुलकर, झाला मुंबई संघात समावेश





