इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु आहे. चौथ्या दिवशी यजमान इंग्लंडने दमदार फलंदाजी करत आपल्या दुसऱ्या डावात ३०३ धावा बनविल्या. आता भारताला चौथ्या दिवशीचा खेळ व पाचवा दिवस मिळून विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कर्णधार जो रूटने शानदार शतक ठोकून इंग्लंडला सामन्यात थोडेफार पुनरागमन करून दिले.
रूटचे शानदार शतक
मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंड संघ काहीसा माघारला होता. मात्र, दुसऱ्या डावात त्याने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत १०९ धावांची शानदार खेळी केली. त्याचे कसोटी क्रिकेटमधील भारताविरुद्धचे सहावे शतक आहे. त्याने भारताविरुद्ध आत्तापर्यंत २१ कसोटी सामने खेळताना ५६.५ च्या सरासरीने १९६२ धावा केल्या आहेत. चालू वर्षातील त्याचे हे भारताविरुद्धचे दुसरे शतक आहे. यावर्षी भारत दौऱ्यावर त्याने चेन्नई कसोटीत द्विशतकी खेळी केली होती.
भारताला नेहमी सतावतो रूट
जो रूट हा नेहमीच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला सतावत आला आहे. विशेष म्हणजे २०१४ सालापासून केलेल्या प्रत्येक कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याच्या बॅटमधून मोठ्या धावा आलेल्या दिसून येतात. २०१४ मध्ये मालिकेतील पहिल्या ट्रेंट ब्रिज कसोटीतच त्याने १५४ धावांची खेळी केली होती. २०१६ च्या भारत दौऱ्यावरील पहिल्या राजकोट कसोटीत १२४ धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली होती.
त्यानंतर, २०१८ मालिकेवेळी त्याने एजबॅस्टन येथे ८० धावा ठोकलेल्या. चालू वर्षी भारत दौऱ्यावरील चेन्नई येथील पहिल्या कसोटीत २१८ धावांची मोठी खेळी त्याने साकारलेली. चालू सामन्यातील पहिल्या डावात देखील ६४ धावा त्याने ठोकलेल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयची मोठी घोषणा, ऑलिम्पिक विजेत्यांना देणार ‘इतक्या’ रकमेचे रोख पारितोषिक
भारतीयांसाठी भावूक क्षण! १३ वर्षानंतर वाजले ऑलिम्पिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत, पाहा व्हिडिओ
उर्वरित आयपीएल २०२१ ची तयारी सुरू; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सदस्यांनाच जाता येणार युएईला