भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने पहिल्या डावात झुंजार द्विशतक केले आहे. यासह रुटने खास पराक्रमही केला आहे.
गेल्या १० वर्षांपासून एकही परदेशी क्रिकेटपटू भारतातील मैदानावर कसोटी क्रिकेट खेळताना द्विशतक करू शकला नव्हता. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्यूलम हा मागील १० वर्षात भारतात द्विशतक करणारा शेवटचा फलंदाज होता. नोव्हेंबर २०१० मध्ये हैदराबाद येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या कसोटी सामन्यात त्याने २२५ धावा केल्या होत्या. ३०८ चेंडूंचा सामना करताना २२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने त्याने ही खास कमागिरी केली होती.
मॅक्यूलमनंतर केवळ रुटने चेन्नई येथे चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात हा कारनामा केला आहे. ३७७ चेंडूत २ षटकार आणि १९ चौकारांच्या मदतीने २१८ धावा करत त्याने या विक्रमाला गवसणी घातली आहे.
एवढेच नव्हे तर, मागील ६ वर्षात भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करण्याची खास कामगिरीही फक्त रुटला जमली आहे. २०१३-१४ मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात झालेल्या कसोटी सामन्यात मॅक्यूलमने ३०२ धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर फक्त रुट भारताविरुद्ध २०० पेक्षा जास्त धावा करू शकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
थँक्यू नदीम! ज्याच्या निवडीवरून केली टीका तोच ठरला टीम इंडियाचा संकटमोचक
अररर! केवळ ५ षटकात टीम इंडियाने सोडले २ झेल, रनआऊटची संधी अन् २ रिव्ह्यूही गमावले






