भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) होत आहे. या सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे.
विशेष म्हणजे रुट त्याच्या कारकिर्दीतील हा १०० वा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे त्याने एक खास विक्रम केला आहे. रुट हा १०० व्या कसोटी सामन्यात शतक करणारा जगातील नववा फलंजदाज ठरला आहे. तर इंग्लंडचा तिसरा फलंदाज आहे.
त्याच्याआधी सर कॉलिन कॉवड्रे, जावेद मियाँदाद, गोर्डन ग्रिनिज, ऍलेक स्टिवर्ट, इंजमाम-उल-हक, रिकी पाँटिंग, ग्रॅमी स्मिथ आणि हाशिम अमलाने असा पराक्रम केला आहे. यातील पाँटिंगने त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यांत दोन्ही डावात शतके केली आहेत.
कारकिर्दीतील ९८,९९ आणि १०० व्या सामन्यात शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज –
जो रुटने भारताविरुद्ध १०० वा कसोटी सामना खेळण्याआधी श्रीलंकेत श्रीलंकेविरुद्ध ९८ वा आणि ९९ वा कसोटी सामना खेळताना देखील शतकी खेळी केली आहे. त्याने त्याच्या ९८ व्या सामन्यात २२८ धावांची द्विशतकी खेळी केली होती. तर ९९ व्या कसोटी सामन्यात १८६ धावांची शतकी खेळी केली होती.
त्यामुळे रुट हा कारकिर्दीतील ९८ व्या, ९९ व्या आणि १०० व्या कसोटीत १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
पहिल्या दिवसाखेर इंग्लंडचे वर्चस्व –
भारताविरुद्ध चेन्नईमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर (५ फेब्रुवारी) इंग्लंडने पहिल्या डावात ८९.३ षटकात ३ बाद २६३ धावा केल्या आहेत. या सामन्यात जो रुट १९७ चेंडूत १२८ धावांवर नाबाद राहिला आहे. त्याने दिवसाखेरपर्यंत १४ चौकार आणि १ षटकार ठोकला. याशिवाय त्याने तिसऱ्या विकेटसाठी डॉम सिब्लीसह द्विशतकी भागीदारीही केली आहे. सिब्ली दिवसाच्या शेवटच्या षटकात ८७ धावांवर बाद झाला.
कारकिर्दीतील १०० व्या कसोटी सामन्यात शतक करणारे क्रिकेटपटू –
१९६८ – सर कॉलिन कॉवड्रे (१०४ धावा)
१९८९ – जावेद मियाँदाद (१४५ धावा)
१९९० – गोर्डन ग्रिनिज (१४९ धावा)
२००० – ऍलेक स्टिवर्ट (१०५ धावा)
२००५ – इंजमाम-उल-हक (१८४ धावा)
२००६ – रिकी पाँटिंग (१२० धावा आणि १४३* धावा)
२०१२ – ग्रॅमी स्मिथ (१३१ धावा)
२०१७ – हाशिम अमला (१३४ धावा)
२०२१ – जो रुट (१२८* धावा)
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! लिव्हरपूलला जर्मनीमध्ये येण्यास बंदी, ‘हे’ आहे कारण
ब्रेकिंग! प्रसिद्ध फुटबॉलपटू आंद्रे ओन्नावर एका वर्षाची बंद, ‘हे’ आहे कारण