भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंड संघ मजबूत स्थितीत दिसून आला. पाहुण्या संघाचा कर्णधार जो रूटच्या नाबाद शतकामुळे पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने ३ बाद २६३ धावा केल्या. यादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवून रूटला केलेल्या मदतीमुळे अनेकांनी त्याचे कौतुक केले. आता स्वत: रूटनेही विराटवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
विराटकडून खिलाडू वृत्तीचा उत्तम दाखला- रूट
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना रूट म्हणाला की, “माझ्या पायात थोडा क्रॅम्प आला होता. त्यामुळे मला वेदना होत होत्या. यावेळी लगेचच विराट माझ्याजवळ आला आणि त्याने माझी मदत केली. तो खूप दयाळू आहे. त्याने खूपच चांगली खिलाडूवृत्ती दाखवली. आपण सर्वजण त्याच्याकडून याच गोष्टीची अपेक्षा करतो.”
विराटची खिलाडू वृत्ती पाहून झाली धोनीची आठवण
इंग्लंडचा कर्णधार शतक झळकावल्यावर देखील अतिशय आत्मविश्वासाने खेळत होता. अशात ८७व्या षटकाला आर अश्विन गोलंदाजी करत असताना रूटने शेवटच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचला. मात्र त्यानंतर नॉन-स्ट्रायकर एंडकडे येत असताना त्याला पायात वेदना झाली आणि तो जमिनीवर पडला. त्यावेळी सामना थांबवण्यात आला आणि इंग्लंडचे फिजिओ मैदानात आले. मात्र फिजिओ येण्याआधी विराटच रूटच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले. विराटने रूटचे पाय स्ट्रेच करत त्याची वेदना कमी करण्यासाठी मदत केली.
भारतीय कर्णधाराने दाखवलेली ही खिलाडूवृत्ती पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले. तसेच ही घटना पाहून अनेकांना माजी कर्णधार एमएस धोनीची आठवण झाली. धोनीने काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला देखील अशीच मदत केली होती.
#SpiritOfCricket at its very best ????????#INDvENG @Paytm | @imVkohli pic.twitter.com/vaEdH29VXo
— BCCI (@BCCI) February 5, 2021
Same energy. pic.twitter.com/yjTwvr8RaV
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 5, 2021
इंग्लंड संघाचा डाव तिनशे पार
भारत आणि इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याविषयी बोलायचे झाले तर, इंग्लंडने ३ बाद २६३ धावांपासून पुढे दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला आहे. पहिल्या दिवशी सलामीवीर रॉरी बर्न्स ३३ धावा, डॉम सिब्ले ८७ धावा आणि डॅनियल लॉरेन्स शून्य धावांवर बाद झाले होते. कर्णधार जो रूट नाबाद १५० धावांवर खेळत आहे. तर बेन स्टोक्सचेही अर्धशतक पूर्ण झाले आहे. यासह इंग्लंडने दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रापर्यंत ३५० धावा फलकावर नोंदवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-





