एकिकडे इंडियन प्रीमीयर लीग गाजत असतानाच क्रिकेट विश्वातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू जो रुट याने कसोटी कर्णधारपद सोडले आहे. त्याने हा निर्णय शुक्रवारी (१५ एप्रिल) जाहिर केला. याबद्दल इंग्लंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे. जो रुट गेले ५ वर्षे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे कर्णधारपद सांभाळत होता.
साल २०१२ मध्ये कसोटी पदार्पण केलेला जो रुट (Joe Root) इंग्लंडचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. तो गेल्या अनेक महिन्यांपासून शानदार कामगिरी करत असून २०१७ पासून इंग्लंडचे कसोटी कर्णधारपद सांभाळत होता. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ६४ कसोटी सामने खेळले. यातील २७ सामन्यांत विजय मिळवला असून २६ सामन्यांत पराभव पत्करला आहे. तसेच ११ सामने अनिर्णित राहिले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे जो रुट इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होता. त्याने इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने कर्णधार म्हणून जिंकले होते. त्याने याबाबतीत मायकल वॉन (२६ विजय), सर ऍलिस्टर कूक (२४) आणि अँड्र्यू स्ट्रॉस (२४) यांना मागे टाकले होते. त्याचबरोबर त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत त्याने २०१८ मध्ये भारताविरुद्ध ४-१, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०२० साली ३-१ अशा फरकाने विजय मिळवला होता. तसेच २००१ नंतर तो पहिलाच इंग्लंडचा कर्णधार बनला होता, ज्याने श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली होती. त्याने २०२१ साली श्रीलंकेविरुद्ध २-० अशा फरकाने विजय मिळवला होता.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची फारशी चांगली कामगिरी झाली नव्हती. त्यांना गेल्या ५ कसोटी मालिकेत पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर टिका होत होती. अखेर त्याने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे (Joe Root steps down as England Test captain).
रुट हा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा इंग्लंड खेळाडूही आहे. त्याने कसोटीत नेतृत्व करताना ६४ सामन्यांत ४६.४४ च्या सरासरीने ५२९५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १४ शतकेही केली असून हा देखील एक विक्रम आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
GT vs RR | रस्सी वॅन डर ड्यूसेनचा कमाल थ्रो! थेट स्टम्पवर चेंडू फेकत वेडला धाडले माघारी, पाहा Video
अखेरच्या भारत दौऱ्यावर पाकिस्तानी क्रिकेटर्ससोबत पत्नींना पाठवण्यामागे होता खास उद्देश, झाला खुलासा
फक्त हार्दिक नव्हे हार्दिक २.० व्हर्जन म्हणा! गुजरात टायटन्सचा कर्णधार प्रत्येक विभागात दाखवतोय चमक