---Advertisement---

भारताविरुद्ध शंभरावा कसोटी सामना खेळत ‘या’ दिग्गजांनी गाजवले मैदान

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 8:12 PM
---Advertisement---

इंग्लंडच्या जवळपास दोन महिने इतक्या दीर्घ दौऱ्याला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथील कसोटीने सुरुवात होईल. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई येथील ऐतिहासिक एम.ए. चिदंबरम स्टेडियम अर्थात चेपॉकवर होतील. उर्वरित दोन सामने नव्याने बांधण्यात आलेल्या अहमदाबाद येथील मोठे स्टेडियमवर खेळवले जातील.

रूटसाठी स्पेशल ठरणार चेन्नई कसोटी

कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडचा कर्णधार जो रूटसाठी अगदी ‘स्पेशल’ आहे. कारण, हा त्याच्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना असेल. चेन्नई येथील चेपॉक मैदानावर उतरल्यानंतर रूट इंग्लंडसाठी १०० कसोटी सामने खेळणारा पंधरावा कसोटीपटू बनेल. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० कसोटी खेळणारा ६९ वा क्रिकेटपटू बनण्याचा मान त्याला मिळेल. याव्यतिरिक्त, रूट आणखी एका खास यादीत समाविष्ट होईल. आपला १०० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना भारतीय संघाविरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा अकरावा क्रमांक लागेल.

आज आपण रूटपूर्वी भारताविरुद्ध आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या १० खेळाडूंविषयी व त्या खेळाडूंच्या त्या सामन्यातील कामगिरी विषयी जाणून घेऊया.

१) जावेद मियांदाद

पाकिस्तानचे सर्वकालीन महान फलंदाज जावेद मियांदाद यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीतील शंभरावा सामना भारताविरुद्ध खेळला होता. भारतीय संघ १९८९-१९९० या दौऱ्यासाठी पाकिस्तानात गेल्यानंतर लाहोर कसोटीत मियाँदाद यांनी हा विक्रमी पल्ला गाठला होता. मियांदाद यांनी ही कसोटी यादगार बनवत १४५ धावांची दमदार खेळी केली होती. हा सामना अनिर्णित राहिला होता.

२) ग्रॅहम गूच

इंग्लंडचे दिग्गज फलंदाज ग्रॅहम गूच यांनी आपल्या कारकिर्दीतील शंभरावा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला. १९९२-१९९३ च्या या भारत दौऱ्यावर कर्णधार या नात्याने आलेल्या गूच यांच्यासाठी हा सामना विसरण्यासारखा राहिला. ते कसोटीच्या दोन्ही डावात प्रत्येकी १७ व १८ धावा काढू शकले. भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या पहिल्या डावातील १८२ व गोलंदाजांनी दोन्ही डावात केलेल्या किफायतशीर गोलंदाजीमुळे भारताने हा सामना आठ गडी राखून जिंकला होता.

३) मार्क वॉ

भारतीय संघ १९९९-२००० यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असता ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज मार्क वॉ याने सिडनी कसोटीत १०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम केला. वॉने या सामन्यात ३२ धावांची छोटेखानी खेळी केली. मात्र, जस्टिन लैंगरचे द्विशतक व रिकी पॉंटिंगच्या शतकामूळे ऑस्ट्रेलियाने भारतावर एक डाव आणि १४१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.

४) कार्ल हूपर

सन २००२ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार असलेल्या कार्ल हूपर यांनी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत सहभागी होत, १०० आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्याचा मान मिळवला. या कसोटीत वेस्ट इंडीज संघाला एक डाव व ११२ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. हूपर यांनी या सामन्यातील दोन डावात मिळून फक्त २४ धावा काढल्या. याच मालिकेतील अखेरची कोलकता कसोटी खेळून हूपर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

५) ग्लेन मॅकग्रा

ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांनीदेखील आपला १०० वा कसोटी सामना भारतविरुद्ध खेळला होता. नागपूर येथे झालेल्या या कसोटीत मॅकग्राने पहिल्या डावात तीन व दुसऱ्या डावात २ बळी घेत समाधानकारक कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियन संघाने सांघिक कामगिरी दाखवत तब्बल ३४२ धावांनी विजय साजरा केला होता.

६) इंजमाम उल-हक

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल-हक याने देखील आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील शंभरावा सामना भारताविरुद्ध खेळला. सन २००४ च्या भारत दौऱ्यावर पाकिस्तान संघाचा कर्णधार म्हणून आलेल्या इंजमामने बेंगलोर कसोटीत हा विक्रमी टप्पा पार केला. या सामन्यात इंजमामने १८४ धावांची संस्मरणीय खेळी साकारली होती. युनूस खानने फलंदाजीत कमाल दाखवल्याने पाकिस्ताने हा सामना १६८ धावांनी जिंकला.

७) एबी डिव्हिलियर्स

आधुनिक क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाज मानला गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही आपल्या कसोटी कारकिर्दीतील शंभरावा सामना भारताविरुद्ध खेळला होता. पावसामुळे पूर्ण न होऊ शकलेल्या सामन्यात डिव्हिलियर्सने ८५ धावांची खेळी साकारली होती. हा सामना बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता.

८) स्टुअर्ट ब्रॉड

मागील दशकातील सर्वोत्तम कसोटी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने २०१६-२०१७ च्या भारत दौऱ्यावर आपला शंभरावा कसोटी सामना खेळलेला. राजकोट येथील या सामन्यात ब्रॉड साफ अपयशी ठरला होता. कसोटीच्या दोन्ही डावात मिळून त्याला अवघा एक बळी मिळवता आलेला. कर्णधार ऍलिस्टर कुकच्या शतकाने इंग्लंडने ही कसोटी अनिर्णित राखली होती.

९) रॉस टेलर

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने गतवर्षी भारताविरुद्धच्या मालिकेत वेलिंग्टन येथील सामन्यात १०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने पूर्ण केले. या सामन्यात टेलरला अवघ्या ४४ धावांची खेळी करता आली. मात्र, न्‍यूझीलंड संघाने १० गड्यांनी सामना जिंकत त्याला विजयी भेट दिली.

१०) नॅथन लायन

शेन वॉर्ननंतर ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून नावाजला गेलेल्या ऑफस्पिनर नॅथन लायनने भारताविरुद्ध संपलेल्या मालिकेत नुकतेच १०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळण्याची कामगिरी केली. या सामन्यात लायनने दोन्ही डावात मिळून तीन गडी बाद केले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिका आपल्या नावे केली होती. सामन्यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने लायनला भारतीय खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली होती.

या सर्व दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील होणारा रूट आपल्या शंभराव्या कसोटीत कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या:

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्यानंतर एम अश्विनने काढली स्वर्गीय आईची आठवण, लिहली भावनिक पोस्ट

ब्रेकिंग! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या कारणामुळे दक्षिण आफ्रिका दौरा केला स्थगित

ब्रेकिंग! क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, स्टार गोलंदाज अशोक दिंडाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---