लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यातील चौथ्या दिवशी (२८ ऑगस्ट) इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे. यासह कसोटी मालिका १-१ च्या बरोबरीत आणली आहे. या विजयासह कर्णधार जो रूटने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाचा २७ वा विजय होता. यासह तो इंग्लंड संघासाठी सर्वाधिक कसोटी सामन्यात विजय मिळवणारा कर्णधार ठरला आहे. त्याने या यादीत मायकल वॉन आणि अँड्र्यू स्ट्रॉस सारख्या दिग्गज कर्णधारांना मागे टाकले आहे. मायकल वॉन यांनी २६ कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. तर अँड्र्यू स्ट्रॉसने २४ सामन्यात विजय मिळवला होता.(Joe root won most test as captain for England)
इंग्लंड संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे कर्णधार
२७ सामने -जो रूट*
२६ सामने – मायकल वॉन
२४ सामने -अँड्र्यू स्ट्रॉस
२४ सामने -ॲलिस्टर कूक
२० सामने – पिटर मे
भारतीय संघाचा १ डाव ७६ धावांनी पराभव
या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. आता इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले आहे. सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत ४३२ धावांचा डोंगर उभारला होता. यासह ३५४ धावांची आघाडी घेतली होती.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मजबूत पकड बनवल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज चांगली फलंदाजी करतील अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आहे.
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच चेतेश्वर पुजारा ९१ धावा करत माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ विराट कोहली देखील ५५ धावा करत माघारी परतला. तसेच अजिंक्य रहाणे अवघ्या १०, तर रिषभ पंत १ धाव करत स्वस्तात माघारी परतले. शेवटी जडेजाने ३० धावांची झुंज दिली. परंतु, ही झुंज अपयशी ठरली. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २७८ धावांवर संपुष्टात आला. हा सामना इंग्लंड संघाने १ डाव आणि ७६ धावांनी आपल्या नावावर केला. यासह मालिका १-१ च्या बरोबरीत आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शतकाच्या दुष्काळातही कोहलीचा ‘विराट’ कारनामा; लीड्स कसोटीत अर्धशतकासह धोनीला पछाडलं
दारूण पराभवानंतर विराट ‘या’ नकोश्या यादीत दुसऱ्या स्थानी
रहाणेची विकेट अँडरसनसाठी ठरली ‘विक्रमी’! मुरलीधरननंतर ‘हा’ पराक्रम करणारा जगातील दुसराच गोलंदाज