इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या हाताच्या कोपराच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले असून त्याचा जोरदार फटका इंग्लंड संघाला बसला आहे. आर्चर गेल्या अनेक दिवसांपासून या दुखापतीवर काम करत आहे. पण ही दुखापत पुन्हा वाढल्याने त्याला अगामी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमध्ये २ जूनपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत आर्चर खेळेल असे सर्वांना वाटले होते, कारण नुकतेच त्याने दुखापतीवर मात करत मैदानावर पुनरागमन केले होते. तो केन्ट विरुद्ध ससेक्स संघाच्या काउंटी चॅम्पियनशिपमधील सामन्यात खेळत होता. ससेक्सकडून खेळणार्या आर्चरने पहिल्या डावात २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र तो दुसऱ्या डावात दुखापतीमुळे केवळ ५ षटकेच गोलंदाजी करू शकला.
त्याच्या दुखापतीबद्दल इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले की ‘इंग्लंड आणि ससेक्स संघाचे वैद्यकिय पथक याबद्दल जाणून घेईल आणि हाताच्या कोपरावर काय उपचार करायचे, हे जाणून घेण्यासाठी आर्चर या आठवड्यात वैद्यकिय सल्ला घेईल.’
आर्चरला गेल्या अनेक महिन्यांपासून कोपाराच्या दुखापतीचा त्रास होत आहे. याच दुखापतीमुळे त्याला मार्चमध्ये भारताविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकावे लागले होते. तसेच तो आयपीएल २०२१ हंगामातूनही बाहेर पडला होता. दरम्यान, त्याच्या हातावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. घरी फिशटँक साफ करत असताना काचेचा तुकडा त्याच्या हातात घुसला होता, त्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागली होती.
महत्त्वाचं म्हणजे इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर मायदेशातच ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान भारताविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी आर्चर पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा अशी इंग्लंडा अपेक्षा असेल.
आर्चरची कसोटी कारकिर्द
आर्चरने इंग्लंडकडून १३ कसोटी सामने खेळले असून यात ३१.०४ च्या सरासरीने ४२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ३ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामाही केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीने अवघ्या सातव्या सामन्यात उंचावलेलली आयसीसी ट्रॉफी, तर विराट ‘इतके’ सामने खेळून अजून प्रतिक्षेत
सीएसकेच्या ‘या’ प्रशिक्षकाने केली कोरोनावर यशस्वीपणे मात
‘ही’ आहे भारतीय महिला संघाची ‘लेडी धोनी’, एकसारखीच आहे कहाणी