सध्या इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, सध्या सुरू असलेली पाच सामन्यांची टी२० मालिका चार सामन्यानंतर बरोबरीत उभी आहे. या मालिकेनंतर होणाऱ्या वनडे मालिकेत इंग्लंड संघ आपल्या प्रमुख वेगवान गोलंदाजाला विश्रांती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंग्लंड संघ देऊ शकतो या प्रमुख गोलंदाजाला विश्रांती
सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच सामन्यांची टी२० मालिका अहमदाबाद येथे खेळली जात आहे. मालिकेतील अखेरचा सामना सुरु आहे. त्याच वेळी इंग्लंडच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. टी२० मालिकेनंतर होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंड संघ व्यवस्थापन प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला विश्रांती देऊ शकते.
कसोटी मालिकेच्या अखेरच्या सामन्यात कोपराच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती दिली गेलेली. या मालिकेनंतर आर्चर आयपीएलमध्ये सहभागी होईल. तसेच, इंग्लंड संघ त्यानंतर प्रतिष्ठेची ऍशेस मालिका व टी२० विश्वचषक खेळणार आहे. या दोन महत्त्वाच्या स्पर्धांच्या अनुषंगाने, आर्चरला विश्रांती देणे गरजेचे असल्याचे, इंग्लंडच्या संघाकडून सांगण्यात येत आहे. जोफ्रा आर्चर ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करेल.
पुणे येथे खेळली जाणार वनडे मालिका
टी२० मालिकेनंतर उभय संघांमध्ये २३ मार्चपासून दिवस-रात्र स्वरूपाची वनडे मालिका खेळली जाईल. मालिकेतील तिन्ही सामने पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर खेळले जातील. कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे हे सामने बंद दाराआड विना प्रेक्षक खेळविण्यात येतील. सध्या भारतीय संघ वनडे दुसऱ्या स्थानी तर, इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे.
नव्या गोलंदाजाला मिळू शकते संधी
आर्चरला आराम दिला गेल्यास इंग्लंड संघात वनडे मालिकेसाठी नव्या गोलंदाजाला संधी मिळू शकते. इंग्लंडने या मालिकेसाठी अजून आपल्या संघाची घोषणा केली नाही. मात्र, त्याच्याऐवजी टॉम करन, टोप्ले राईस अथवा सॅम करन यांना पाचारण केले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे’ तीन भारतीय खेळाडू निघाले पंचांना शोधायला, दिनेश कार्तिकने शेअर केले मीम
वाढदिवस विशेष : कपिल देवचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे मदन लाल






