भारतीय क्रिकेटला एक नवे रंग-रूप देण्यात सौरव गांगुली आणि त्याच्या संघाचा जेवढा वाटा आहे तेवढाच वाटा त्यावेळचे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जॉन राईट यांचादेखील आहे. प्रशिक्षणाची नवीन परिभाषा भारतीय क्रिकेटला शिकवणाऱ्या जॉन राईट यांचे विषयी जरा जाणून घेऊया.
१९७८ मध्ये न्यूझीलंडकडून कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या राईट यांनी ८० च्या दशकात किवी संघाला कसोटी खेळणारा देश म्हणून प्रस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात राईट यांनी जवळपास सहा तास फलंदाजी केली आणि न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी विजय मिळवून दिला. सहा तास फलंदाजी करून त्यांनी अर्धशतक साजरे केले होते.
राइट यांनी न्यूझीलंडकडून ८२ कसोटी सामन्यात ३७.८२ च्या सरासरीने ५,३३४ धावा केल्या, त्यात १२ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. आपल्या प्रथमश्रेणी कारकीर्दीत राईट यांनी ३६६ सामन्यात ४२.३५ च्या सरासरीने २५,०७३ धावांचा रतीब घातला. त्यांच्या नावे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ५९ शतके व १२६ अर्धशतके आहेत.
निवृत्त झाल्यानंतरही राईट क्रिकेटच्या मैदानापासून दूर गेले नाहीत. त्यांनी केंट काउंटी संघासह प्रशिक्षण कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर सन २००० मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पहिला परदेशी प्रशिक्षक बनण्याचा मान मिळवला.
सौरव गांगुलीसारख्या दिग्गज कर्णधारांसह काम करताना राईट यांनी भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलला. २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकलेल्या कसोटी मालिकेसह इंग्लंडमध्ये नेटवेस्ट कप, २००३ विश्वचषक अंतिम फेरी यासारख्या स्पर्धांमध्ये राइट यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने दमदार कामगिरी केली
राईट-गांगुलीची जोडी योग्य जमली होती. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील चांगल्या संवादाचा परिणाम टीमच्या ड्रेसिंग रूम आणि स्कोअरबोर्ड या दोहोंमधून दिसून येतो. या जोडीच्याबाबत, ‘विस्डेन अँथोलॉजी १९७८-२००६ : क्रिकेट एज ऑफ रेव्होल्यूशन’ पुस्तकात लिहिले होते की,
“नवीन आणि बळकट टीम इंडिया बनविण्यात कर्णधार सौरव गांगुली आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी कागदावर लिहिलेल्या गोष्टींपेक्षा इतर गोष्टींनी संघाला अधिक समृद्ध बनवले. आपल्या प्रयत्नांनी भारतीय संघ महान बनत आहे. ”
राईट यांच्या पूर्वी, भारतीय प्रशिक्षकदेखील, उत्तम परिस्थिती हाताळत. बिशनसिंग बेदींसारखे प्रशिक्षक खूपच कठोर होते आणि अजित वाडेकरांनी विरोधी संघाला घरेलू खेळपट्ट्यांवर रोखण्यासाठी तगडी फिरकी गोलंदाजांची फळी तयार केली.
राईट यांच्या आगमनाने, तांत्रिकदृष्ट्या भारतीय संघात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. त्यांच्या काळातील तंदुरुस्ती म्हणजे फक्त फिल्डिंग ड्रिल आणि चार फेऱ्या नव्हत्या. राईट यांनी टीम इंडियाला घरगुती फिरकीच्या सहाय्यक खेळपट्ट्यांवर जिंकण्यास मदत केलीच शिवाय गांगुलीच्या संघाला परदेशातही जिंकण्याची कला शिकवली.
२००५ मध्ये टीम इंडियाबरोबरचा कार्यकाळ संपल्यानंतर राईट यांना २०१० मध्ये आपल्या राष्ट्रीय संघासाठी काम करण्याची संधी मिळाली. प्रशिक्षकपदाच्या दोन वर्षांच्या अल्प कालावधीत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील २६ वर्षानंतर २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला होता.
तसेच, राईट यांच्या कार्यकाळात किवी संघ २०११ च्या विश्वचषक उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला. त्यांनी २०१२ मध्ये न्यूझीलंड संघाचा प्रशिक्षक म्हणून पद सोडले. २०१३ च्या मोसमात ते आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक होते. त्यावर्षी मुंबईने आपला पहिला आयपीएल किताब जिंकला. पुढे, त्यांनी काही वर्ष मुंबईसाठी युवा खेळाडू शोधले. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या त्यापैकीच आहेत. राईट सध्या डर्बशायर काउंटी क्लबचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.