भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये ५ टी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने सर्वाधिक ८३ धावांची खेळी करत सामना भारतीय संघाकडून हिसकावून घेतला. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार लगावात, चौफेर फटकेबाजी करत ८३ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच दिग्गज भारतीय क्रिकेटपटुंनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या १५७ धावांचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि डेव्हिड मलान हे दोघे स्वस्तात माघारी परतले होते. पण त्यानंतर बटलर आणि जॉनी बेअरस्टोने मिळून सामना संपवला.
बटलरच्या या खेळीवर स्तुतीसुमने उधळत गौतम गंभीर म्हणाला, “फिरकी गोलंदाज असो किंवा जलद गोलंदाज बटलरकडे फलंदाजी करताना खूप पर्याय उपलब्ध असतात. तो रिव्हर्स स्वीप, लेप शॉट यासोबतच पुल शॉट आणि कट शॉट देखील चांगला खेळतो. अगदी मिस्टर ३६० एबी डीवीलियर्स सारखे.’
‘भारतीय संघाविरुद्ध खेळलेल्या ८३ धावांच्या खेळीमध्ये हे दिसूनही आले. त्याने या खेळीत १७ धावा पुल शॉटने केल्या. तसेच ४५ धावा ऑन साईडला केल्या तर २९ धावा ऑफ साईडला केल्या. तो किती निडर फलंदाज आहे, याचा अंदाजा याच गोष्टीवरून लावता येऊ शकतो. त्याने पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी आलेल्या यूजवेंद्र चहलच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. याच षटकात जेसन रॉय बाद झाला. याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर दिसला नाही. त्याने शेवटच्या चेंडूवर देखील षटकार लगावला.”
धावांचा पाठलाग करताना, एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज
जोस बटलरने या सामन्यात ८३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. या खेळीनंतर तो टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावांची खेळी करताना तिसरा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी२० सामन्यात ८९ धावांची खेळी केली होती. तसेच दुसऱ्या स्थानी न्यूझीलंड संघाचा यष्टिरक्षक फलंदाज टिम सिफर्ट आहे. त्याने ८४ धावांची खेळी केली होती.
इंग्लंड संघासाठी सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिका धावांची खेळी करणारे यष्टीरक्षक फलंदाज
जोस बटलरने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात अर्धशतक झळकावताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. बटलरने आतापर्यंत एकूण ५० वेळा ५० धावांचा आकडा पार केला आहे. तसेच या यादीत पहिल्या स्थानी एलेक स्टीवर्ट आहे. त्याने इंग्लंड संघासाठी ५९ वेळा हा कारनामा केला आहे. तर तिसऱ्या स्थानी मॅट प्रायर आहे. त्याने ३८ वेळा अशी कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
जसप्रीत बुमराहचा रोमँटिक अंदाज; पत्नी संजनासह डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
केदार जाधवची नव्या प्रवासाला सुरुवात! सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
सात वर्षांनंतर ‘इंडो-पाक एक्सप्रेस’ एकत्र; मात्र पहिल्याच फेरीत बसला पराभवाचा धक्का





