अहमदाबाद। शुक्रवारी (२७ मे) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात क्वालिफायर दोनचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात बेंगलोरला ७ विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. पण राजस्थानने मात्र विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. राजस्थानच्या या विजयाचा शिल्पकार ठरला सलामीवीर जोस बटलर. त्याने या सामन्यात शतकी खेळी केली. याबरोबरच मोठा विक्रमही केला.
बेंगलोरने दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून बटलरने (Jos Buttler) या सामन्यात ६० चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १०६ धावा ठोकल्या. त्याच्या या शतकामुळे आता त्याच्या आयपीएल २०२२ प्लेऑफच्या फेरीत एकूण १९५ धावा झाल्या आहेत. त्याने पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध ८९ धावांची खेळी केली होती.
त्यामुळे आता तो एका आयपीएल हंगामातील प्लेऑफच्या फेरीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नावावर होता. त्याने २०१६ साली आयपीएलच्या प्लेऑफमध्ये १९० धावा ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे बटलरला आता अंतिम सामना देखील खेळायचा आहे. त्यामुळे तो या यादीत २०० धावांचा टप्पा पार करणाराही पहिला खेळाडू ठरू शकतो.
या यादीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर रजत पाटीदार (Rajat Patidar) आहे. त्यानेही आयपीएल २०२२ मध्ये प्लेऑफच्या फेरीत (IPL 2022 Playoffs) १७० धावा ठोकल्या आहेत. त्याने बेंगलोरकडून खेळताना शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये ५८ धावांची खेळी केली. तसेच त्याआधी त्याने एलिमिनेटर सामन्यात ११२ धावांची खेळी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध केली होती (Most runs in playoffs of an IPL season).
एका आयपीएल हंगामात प्लेऑफ फेरीमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१९५ धावा – जोस बटलर, २०२२
१९० धावा – डेव्हिड वॉर्नर, २०१६
१७० धावा – रजत पाटीदार, २०२२
१५६ धावा – मुरली विजय, २०१२
१५६ धावा – वृद्धिमान साहा, २०१४
बेंगलोरचा पराभव
क्वालिफायर दोनच्या सामन्यात (Qualifier 2) रजत पाटीदारने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर बेंगलोरने २० षटकांत ८ बाद १५७ धावा केल्या होत्या. राजस्थानकडून गोलंदाजी करताना ओबेड मॅकॉय आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यानंतर बटलरने केलेल्या शकतामुळे राजस्थानने १८.१ षटकातच १६१ धावा करत सामना आपल्या नावे केला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
बटलर मारण्यात अन् सिराज-हसरंगा षटकार खाण्यात आघाडीवर; RCBच्या गोलंदाजांचा नकोसा विक्रम
फायनलमध्ये चहलकडे इतिहास रचण्याची संधी, बनू शकतो सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज
यंदाची फायनल RR vs GT संघात, पण आतापर्यंत कुणी खेळला आयपीएलचा अंतिम सामना? घ्या जाणून