मुंबई । लाल मातीत खेळाडू म्हणून दम घुमवल्यानंतर कबड्डी, खो-खो आणि कुस्तीसारख्या देशी खेळांना वर्तमानपत्रात मानाचे स्थान मिळवून देणारे हाडाचे क्रीडा पत्रकार, ऍथलीट, क्रीडा संघटक, खो-खो, कबड्डी प्रशिक्षक शिवराम सोनवडेकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
सोनवडेकर यांनी आपल्या चार दशकांच्या कारकीर्दीत खेळाडू, संघटक, प्रशिक्षक आणि पत्रकार असा देशी खेळांना वाहिलेला संस्मरणीय प्रवास केला. क्रीडा पत्रकारितेत देशी खेळांना मानाचे स्थान मिळवून देण्यापूर्वी ते एक चांगले ऍथलिट म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांची धावण्याची आवड आणि लालबाग-परळमध्ये बालपण गेल्यामुळे कबड्डी, खो-खो त्यांच्या रक्तातच होतं.
एक धावपटू म्हणून ते रुपारेल महाविद्यालयातली आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. अनेक आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी अनेक पुरस्कारही पटकावले. तसेच ते एकाच वेळी कबड्डी आणि खो-खोसुद्धा खेळायचे. ते परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्राचे चित्यासारखी झेप घेणारे आक्रमक होते आणि संरक्षकही होते. त्यांची कबड्डी वीर बजरंग संघाकडून पाहायली मिळाली.
त्यांच शिक्षण दादरच्या दादर विद्यामंदिरामध्ये झालं, पण त्यांची खो-खो आणि कबड्डीपटू म्हणून कारकीर्द बहरली ती रूपारेल महाविद्यालयात दाखल झाल्यावर त्यांच्या सुसाट खेळामुळे रूपारेल आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये खो-खोचा राजा झाला. कबड्डीतही त्यांचा खेळ अफलातून होता. त्यांच्या खेळाच्या जोरावर रूपारेलने खो-खोत अनेक जेतेपदे पटकावली.
महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी खो-खोच्या संघटनेचा कारभारही सांभाळला. ते 70 च्या दशकांत मुंबई खो-खो संघटनेचे प्रमुख कार्यवाहही होते. त्यांच्या कार्यकाळात मुंबई शहर संघाने खो-खोतही आपला दबदबा राखला होता. एवढेच नव्हे तर संघटनेचे प्रमुख कार्यवाह पद भूषविल्यानंतर त्यांनी रूपारेलच्या महिला संघालाही घडवले.
तब्बल दोन दशके ते खो-खोचे प्रशिक्षक होते आणि त्यांचाच संघ आंतरमहाविद्यालयीन चॅम्पियन असायचा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 500 पेक्षा अधिक राज्य आणि राष्ट्रीय दर्जाचे खो-खो आणि कबड्डीपटू खेळाला मिळाले. त्यांच्या पुरस्कार विजेत्या शिष्यांची यादी फार मोठी आहे. त्यांच्या शिष्या वीणा परब हिला अर्जुन पुरस्कारही मिळाला. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांनी महाराष्ट्र खो-खो संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानही केला. पण त्यांच्या प्रशिक्षक म्हणून कारकीर्दीचा गौरव करणे राज्य सरकारला कधीच जमले नाही.
शिवराम सोनवडेकरांना कबड्डी-खो-खो खेळता खेळता त्यांच्यात स्पर्धांच्या वार्तांकनाची आवड निर्माण झाली. बीईएसटीमध्ये कार्यरत असूनही त्यांनी आपली देशी खेळांच्या बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात म्हणून पत्रकारितेतही उडी घेतली. त्यांनी 1976 साली नवशक्तिमधून आपली पार्टटाइम क्रीडा पत्रकारिताही सुरू केली. त्याचमुळे ते कबड्डी, खो-खो आणि कुस्तीतल्या सर्व खेळाडूंच्या परिचयाचे झाले.
स्वत: खेळाडू असल्यामुळे कोणत्याही सामन्याचे वार्तांकन करताना बातमी जिवंत करण्याची शैली त्यांनी चांगलीच आत्मसात केली. त्यांचा स्वभावही रोखठोक असल्यामुळे त्यांच्या बातम्यांची लाल मातीतल्या संघटकांमध्ये चांगलीच दहशत असायची आणि त्याच कारणांमुळे खेळाडूंच्या ते आवडीचे पत्रकारही झाले.
सोनवडेकरांनी 16 वर्षे नवशक्ति आपली क्रीडा पत्रकारिता केल्यानंतर ते सकाळमध्ये रूजू झाले आणि तिथे त्यांच्या देशी खेळांच्या पत्रकारितेचा व्याप वाढला. त्यांनी कबड्डी, खो-खो आणि कुस्तीतल्या खेळाडू आणि संघटकांच्या मुलाखतींवर सुरू केलेले अलबम हे सदर अल्पावधीतच खूप प्रसिद्ध झाले. त्यांनी आपल्या या सदरात तब्बल 325 नामवंत खेळाडूंच्या मुलाखती घेण्याचा पराक्रम केला.
देशी खेळांच्या पत्रकारितेला सोनवडेकरांच्या वार्तांकनाने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी क्रीडा पत्रकारितेसाठी आपल्या बीईएसटी च्या सेवेतूनही स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि ते पूर्णवेळ क्रीडा पत्रकार म्हणून सकाळमध्ये कायम झाले. गेली दहा वर्षे ते आपल्या बळावलेल्या आजारपणामुळे मैदानापासून दूर होते. शेवटपर्यंत मैदानात राहून वार्तांकन करावे ही त्यांची इच्छा अधूरीच राहिली. त्यांच्या निधनाने लाल मातीतल्या तसेच देशी खेळांच्या पत्रकारितेची खूप मोठी हानी झाल्याची भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपूर्वीच त्यांना दिसले आपले मरण
गेली दहा वर्षे मधुमेहाने त्रस्त असलेल्या शिवराम सोनवडेकरांना आपला पाय गमवावा लागला तेव्हा ते पूर्णपणे खचले होते. आता आपण फार काळ जगणार नाही, हे त्यांच्या मनाने मान्य केलं होतं. म्हणून तेव्हा त्यांनी आपल्या स्वताच्या निधनाची बातमी आणि आपली कारकीर्द सर्वांना कळावी म्हणून स्वताच क्रीडा संघटक शशिकांत राऊत यांच्याकडे आपली पूर्ण माहिती दिली होती. माझे निधन झाल्यावर शशि तू ही माहिती सर्वांना दे असेही त्यांनी आवर्जून सांगितले होते.