दोन वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा कोलकाता नाईट रायडर्स संघ तिसरे जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. यापूर्वी कोणी विचारही केला नव्हता की, कोलकाता नाईट रायडर्स संघ अंतिम फेरीत दाखल होईल. कारण हा संघ सुरुवातीच्या काही सामन्यांनतर गुणतालिकेत सहाव्या, सातव्या स्थानी होता. परंतु शेवटच्या काही सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने जोरदार पुनरागमन केले.
एलिनिनेटरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आणि क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत कोलकाता नाईट रायडर्स संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. चला तर पाहूया कसा होता, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास.
पहिल्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी
आयपीएल २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना अवघ्या २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर उर्वरित ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. हा संघ गुणतालिकेत ७ व्या स्थानी होता.
यूएई लेगमध्ये जोरदार पुनरागमन
तसेच यूएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने जोरदार पुनरागमन केले होते. या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले. तसेच प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या तिन्ही संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. परंतु कोलकाता नाईट रायडर्स संघाने रनरेटच्या बाबतीत बाजी मारली आणि आयपीएल २०२१ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
अंतिम लढत
आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने एलिमिनेटरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर ४ गडी राखून विजय मिळवला होता. तर क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघावर ३ गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे तिसरे जेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकापूर्वी विराटने रिषभ पंतला दिले चॅलेंज; पूर्ण न केल्यास होऊ शकते संघातून सुट्टी
एकदम रॉयल! ‘या’ महागड्या हॉटेलात थांबणार भारतीय संघ; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लाजवाब’
जर कोलकाता जिंकले, तर असा कारनामा करणारा मॉर्गन बनणार केवळ चौथा कर्णधार