भारताविरुद्ध मायदेशात दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या खेळाडूंशी असलेल्या वर्तणुकीबाबत एक रिपोर्ट आता समोर आला आहे. या रिपोर्टमधून गोलंदाजांवर अतिरिक्त दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
ड्रेसिंग रूममधील काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसात लँगर यांच्या व्यवस्थापनात त्रुटी आढळून आल्या आहेत. गेले काही महिने खेळाडू सतत बायो बबलमध्ये वेळ व्यतीत करत आहेत. त्यामुळे त्यांची क्षमता कमी झाली आहे.
मात्र ड्रेसिंग रूममधील वातावरणावर खेळाडू फारसे खुश नाहीत. लँगर यांच्या व्यवस्थापनावर खेळाडू नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. गोलंदाजांच्या आकडेवारीवरील सततच्या चर्चेने गोलंदाजही फारसे समाधानी नाहीत. विशेषतः ब्रिस्बेनवरील अखेरच्या सामन्यात लंच ब्रेकच्या दरम्यान गोलंदाजांनी कुठल्या टप्प्यावर खूप खलबत केली गेली, मात्र त्याने केवळ गोंधळ निर्माण झाला, अशीही तक्रार आता पुढे येते आहे.
जस्टिन लँगर यांनी दिली स्पष्टोक्ती
मात्र या सगळ्या बाबींचा लँगर यांनी इन्कार केला आहे. आपले खेळाडूंसोबत उत्तम संबंध असून या सगळ्या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “नेतृत्व करणे म्हणजे लोकप्रियता मिळवण्याची स्पर्धा नव्हे. आणि खेळाडूंच्या प्रत्येक अडचणी सोडविण्याकडे मी लक्ष देत बसलो तर मी माझे काम करू शकणार नाही”, असे ते म्हणाले.
गोलंदाजांच्या आकडेवारीबाबतच्या सततच्या चर्चेबद्दल बोलताना ते म्हणाले, “हे तर अगदीच उलट आहे. मी कधीही गोलंदाजांच्या आकड्यांबाबत चर्चा केली नाही. या कामासाठीच तर विशेषज्ञ गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त केले आहेत. त्यामुळे मी या सगळ्या चर्चेत कधीही पडलो नाही.”
या सगळ्या आरोप-प्रत्यारोपानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया नेमकी काय भूमिका घेणार, याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा, २ नवख्या खेळाडूंना मिळाली जागा
Ind vs Eng : स्टोक्स-आर्चरने केला सरावाला प्रारंभ, उर्वरित सहकारी या तारखेपासून होणार सहभागी