भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान खेळवला जात असलेला तिसरा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आपला दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करत भारताला ४०७ धावांचे लक्ष्य दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र संघाच्या ७१ धावा झाल्या असताना शुबमन गिल बाद झाला. परंतु दुसऱ्या बाजूने रोहित शर्माने नेटाने किल्ला लढवणे चालू ठेवले होते. त्याने अर्धशतक देखील पूर्ण केले होते. मात्र दिवसाचा खेळ संपायला काहीच षटके शिल्लक असताना तो पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला.
भारतीय संघाला हा मोठा धक्का बसला. कारण रोहित खेळपट्टीवर असताना आत्मविश्वासाने धावा काढत होता. मात्र रोहित बाद झाल्याने आम्ही सुटकेचा निश्वास टाकल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिली आहे.
रोहित शर्मा धोकादायक ठरला असता
रोहितबाबत बोलताना लँगर म्हणाले, “रोहित बाद झाल्याने आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. तो आमच्यासाठी धोकादायक ठरू शकला असता. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रोहित एक जागतिक दर्जाचा फलंदाज आहे, तो या खेळपट्टीवर भरपूर धावा करू शकत होता. त्यामुळे त्याचा बळी मिळवणे, आमच्यासाठी महत्वाचे होते. या खेळपट्टीवर बळी मिळवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत आणि उद्याही जिंकण्यासाठी आम्हाला मेहनत घ्यावीच लागेल.”
दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २ बाद ९८ धावा केल्या आहेत. त्यांना जिंकण्यासाठी अजूनही ३०७ धावांची गरज आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दिवसाखेर नाबाद असून पाचव्या दिवशी भारतींय संघाची भिस्त याच दोघांवर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर
मुहुर्त लागला! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी कसोटीत बिनबाद खेळली २० षटके
‘मैदानावर टिकायचं म्हणून तो चेंडू टोलवताना घाबरत होता’, ऑस्ट्रेलियन दिग्गजांची पुजारावर सडकून टीका