मुंबई :- कबड्डीचे एक उत्तम समालोचक, राष्ट्रीय पंच, खेळाडू, नाट्य कलाकार, पत्रकार असे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेले किशोर दादू गावडे यांचे आज दि. ३० डिसेंबर रोजी पहाटे ४-३० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधना समयी ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात्य पत्नी सविता, अमेय व अथर्व ही दोन मुले तसेच सून व नात असा परिवार आहे. भांडुपच्या ज्वलन स्पोर्टस् क्लब या संघातून कबड्डी खेळाडू म्हणून सुरुवात करणाऱ्या किशोरने शेवटी एक समालोचक म्हणून आपले नाव कमविले. भांडुप येथून प्रकाशित होणाऱ्या “शहर मुंबई” या मासिकाचे संपादक म्हणून काही काळ त्यांनी काम पाहिले होते.
बॉम्बे डाईंग मिलमध्ये काम करीत असताना त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. तेथे शब्दोच्चारावर भर देत त्यांनी कबड्डीत समालोचक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. स्पष्ट शब्दोच्चार, त्यात योग्य ठिकाणी सुभाषितांचा केलेला वापर व भारदस्त आवाज यामुळे क्रीडारसिक त्यांच्या समालोचनाने मंत्रमुग्ध होत असत. देवगड तालुक्यातील जामसांडे येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मालवणीत केलेले समालोचन स्थानिकांना आवडल्याने ते गावडेना प्रतिवर्षी निमंत्रित करीत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चषक, राज्य अजिंक्यपद निवड चाचणी, फेडरेशन चषक तसेच अनेक अखिल भारतीय व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धामध्ये आपल्या समालोचनाच्या ओघवत्या शैलीने कबड्डी रसिकांना प्रभावित केले होते.
किशोर गावडे यांच्या निधनाने कबड्डीचा आवाज हरपला. अशा शब्दात महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यंदा १५जुलै २०२३ रोजी ठाणे येथे झालेल्या कबड्डी दिनाचे समालोचन त्यांनीच केले होते. असे पुढे ते म्हणाले. आजच सायंकाळी ४-३० नंतर त्यांच्या पार्थिवावर भांडुप येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकां बरोबरीने कबड्डी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. (Kabaddi’s great commentator Kishore Gawde passed away due to a heart attack)
महत्वाच्या बातम्या –
भारताची डोकेदुखी वाढली; दुसऱ्या कसोटीतून अष्टपैलू माघार घेण्याची शक्यात, सराव करताना दुखापत
श्रीलंकेला मिळाले दोन नवे कर्णधार, झिम्बाब्वेविरूद्द वनडे आणि टी20 मालिकेत करणार नेतृत्व