मुंबई। शुक्रवारी (१३ मे) ब्रेबॉर्न स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना झाला. हा इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ६० वा सामना होता. या सामन्यात पंजाब किंग्सने ५४ धावांनी विजय मिळवला. या विजयात पंजाबच्या फलंदाजांबरोबर गोलंदाजांचेही मोठे योगदान राहिले. त्यातही कागिसो रबाडाने चमकदार कामगिरी करताना एका खास विक्रमाला गवसणी देखील घातली.
रबाडाचा मोठा विक्रम
रबाडाने (Kagiso Rabada) या सामन्यात ४ षटकात २१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने विराट कोहली, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल यांना बाद केले. याबरोबरच त्याने त्याच्या टी२० कारकिर्दीत २०० विकेट्सही (200 T20 wickets) पूर्ण केल्या. आता त्याच्या १४६ टी२० सामन्यांत २१.१८ च्या सरासरीने २०१ विकेट्स झाल्या आहेत.
त्याचमुळे तो सर्वात जलद २०० टी२० विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही ठरला आहे. त्याने या यादीत उमर गुल आणि लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे. गुलने १४७ टी२० सामन्यांत आणि लसिथ मलिंगाने १४९ टी२० सामन्यांत २०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. या यादीत पहिल्या क्रमांकावर राशिद खान असून त्याने १३४ सामन्यांत २०० टी२० विकेट्स पूर्ण केलेल्या, तर सईद अजमलने १३९ टी२० सामन्यांत हा कारनामा करत या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे (Fastest to 200 T20 wickets).
टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट्स घेणारे गोलंदाज
१३४ सामने – राशिद खान
१३९ सामने – सईद अजमल
१४६ सामने – कागिसो रबाडा
१४७ सामने – उमर गुल
१४९ सामने – लसिथ मलिंगा
पंजाबचा विजय
या सामन्यात (Royal Challengers Bangalore vs Punjab Kings) पंजाबने दिलेल्या २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला २० षटकात ९ बाद १५५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ३५ धावा केल्या. अन्य कोणाला खास काही करता आले नाही. पंजाबकडून रबाडाव्यतिरिक्त रिषी धवन आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच हरप्रीत ब्रार आणि आर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबकडून जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी अर्धशतके झळकावली. बेअरस्टोने २९ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांसह ६६ धावांची खेळी केली. तसेत लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूत ७० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार ठोकले. त्यामुळे पंजाबला २० षटकात ९ बाद २०९ धावा करता आल्या. बेंगलोरकडून हर्षल पटेलने ४ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! पंजाबविरुद्ध पराभव तर झालाच, पण आरसीबीने ‘या’ नकोशा यादीतही पटकावला अव्वल क्रमांक
एकदम जबराट! मॅक्सवेलचा स्विच हिट पाहून विराटही आला जोशमध्ये; चाहरला भिरकावला जबरदस्त षटकार
एकच नंबर! भारताची ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कपच्या फायनलमध्ये एन्ट्री, वाचा कामगिरी