श्रीलंकेच्या 25 वर्षीय कामिंडू मेंडिसनं आतापर्यंत केवळ 8 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र एवढ्या अल्प काळात त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये असं काही केलं, जे आजपर्यंत एकही फलंदाज करू शकलेला नाही!
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना गाले येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेनं 90 षटकांत 3 गडी गमावून 306 धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूज 78 धावा करून नाबाद माघारी परतला, तर कामिंडू मेंडिस 51 धावा करून क्रीजवर आहे.
मेंडिसनं या डावात अर्धशतक पूर्ण करताच एक खास विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यानं पदार्पणाच्या कसोटीपासून सलग 8 सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या. या बाबतीत मेंडिसनं पाकिस्तानचा फलंदाज सौद शकीलचा विश्वविक्रम मोडला आहे. सौद शकीलनं पदार्पणापासूनच सलग 7 कसोटी सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात मेंडिसनं शकीलची बरोबरी केली होती.
पदार्पणापासूनच कामिंडू मेंडिस ज्या पद्धतीनं खेळत आहे, ते पाहता त्याला श्रीलंकेचा भावी स्टार म्हटलं जात आहे. जर आपण कामिंडूच्या कसोटी आकडेवारीवर नजर टाकली तर, तो सध्या आपला 8वा कसोटी सामना खेळत आहे. त्यानं आतापर्यंत 13 डावात 873 धावा केल्या. कामिंडूच्या नावावर 4 शतकं आणि 5 अर्धशतकं आहेत. कसोटीतील त्याची सरासरी 79.36 आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात कामिंडूनं शतक झळकावलं होतं. दुसऱ्या सामन्यात दिनेश चंडिमलनं श्रीलंकेसाठी शतक झळकावलं, तर मॅथ्यूज आणि कामिंडूनं अर्धशतक ठोकलं. सामन्याचा पहिला दिवस किवी गोलंदाजांसाठी खूपच कठीण गेला. कर्णधार टीम साऊदीनं एक आणि ग्लेन फिलिप्सनं एक विकेट घेतली. या दोघांशिवाय पहिल्या दिवशी एकाही किवी गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.
हेही वाचा –
21व्या शतकातील भारताची सर्वोत्तम कसोटी इलेव्हन, रोहित-धोनी सारख्या अनेक दिग्गजांना मिळाली नाही जागा!
रिकी पाँटिंग येताच पंजाब किंग्जच्या दोन खास सदस्यांचा रामराम, एका भारतीयाचाही समावेश
विराट कोहली विरुद्ध जो रुट वादात युवराज सिंगची उडी! सांगितलं कोणता खेळाडू सर्वोत्तम